अॅथलेटिक्सचा ‘ट्रॅक’ रुळावर येईना !
By Admin | Updated: March 15, 2015 00:39 IST2015-03-15T00:26:32+5:302015-03-15T00:39:05+5:30
महेश पाळणे , लातूर क्रीडा प्रकारातील सर्वात जास्त इव्हेन्ट असलेल्या अॅथलेटिक्सचे मैदानही क्रीडा संकुलात गुदमरलेलेच आहे. चारशे मीटरचा ट्रॅक व्यासपीठाच्या अतिक्रमणात आहे

अॅथलेटिक्सचा ‘ट्रॅक’ रुळावर येईना !
महेश पाळणे , लातूर
क्रीडा प्रकारातील सर्वात जास्त इव्हेन्ट असलेल्या अॅथलेटिक्सचे मैदानही क्रीडा संकुलात गुदमरलेलेच आहे. चारशे मीटरचा ट्रॅक व्यासपीठाच्या अतिक्रमणात आहे. यासह लांब उडी मैदानाचीही अवस्था दयनीय आहे. त्यामुळे संकुलातील मैदानी खेळांच्या मैदानाचाच बोजवारा उडाला आहे.
२००१ साली क्रीडा संकुलाची स्थापना झाली. सुरुवातीस या ठिकाणी चारशे मीटर्सचा ट्रॅक आखण्यात आला. यानंतर राष्ट्रपतींच्या एका कार्यक्रमाने उभारण्यात आलेल्या व्यासपीठाने गेल्या अनेक वर्षांपासून या ट्रॅकच्या दोन लेन अतिक्रमित केल्या आहेत. त्यामुळे चारशे मीटर्सचा धावणपथ व्यासपीठाखाली दबलेलाच आहे. क्रीडा संकुलात मैदानी खेळाच्या स्पर्धा तालुका ते विभागीय स्तरापर्यंत होतात. मात्र दस्तुरखुद्द क्रीडा कार्यालयाच्याच आयोजकांना चारशे मीटर्सच्या स्पर्धा दोनशे मीटरचे ग्राऊंड आखून उरकाव्या लागत आहेत. याचा फटका थेट खेळाडूंच्या कामगिरीवर होत आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धा चारशे मीटर धावणपथावर होत असल्याने दोनशे मीटरवर तालुका ते विभाग खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंना चारशे मीटर ट्रॅकवर धावावे लागत आहे. यामुळे त्यांच्या बॅलेन्सवर परिणाम होत असून, ते कामगिरीही उत्तम करू शकत नाहीत. याची फिकीर ना क्रीडा खात्याला, ना आव आणणाऱ्या क्रीडा कार्यकर्त्यांना. लांब उडीच्या मैदानाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था आहे. या ठिकाणी दररोज खेळाडूंसह पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना मात्र याचा त्रास होत आहे. रनिंग फिट व्यवस्थित नाही, टेक आॅफ बोर्ड मोडकळीस आलेला, लांब उडीचा खड्डाही डबघाईला आलेला, त्यातील वाळूत मिसळलेली माती तर खेळाडूंच्या पायाला चक्क हानी पोहोचविणारी आहे. त्यामुळे लांब उडीच्या मैदानाची ही दुरुस्ती लांबच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यासह मैदानावर असलेल्या लहान-मोठ्या खडींमुळे उंच उडीसह गोळाफेक, थाळीफेकच्या खेळाडूंनाही अडचण होत आहे. खेळांचा राजा असलेल्या फुटबॉलला गल्ली क्रिकेटच्या अतिरेकामुळे ‘किक्’ बसली आहे. कोणीही या, तीन दांड्या रोवा व क्रिकेट खेळा, अशी अवस्था ट्रॅकजवळ झाली आहे.