केंद्रात मंत्री होण्याची आठवले यांची मनीषा
By Admin | Updated: May 14, 2014 00:30 IST2014-05-14T00:06:27+5:302014-05-14T00:30:22+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून आपली वर्णी लागेल, अशी मनीषा खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

केंद्रात मंत्री होण्याची आठवले यांची मनीषा
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून आपली वर्णी लागेल, अशी मनीषा खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. सवर्णांच्या हल्ल्यात बळी पडलेले दादेगाव (ता. आष्टी) येथील गायकवाड व नानेगाव येथील कसाब कुटुंबियांचे सांत्वन करून मुंबईला परतताना औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, एक्झिट पोलचे अंदाज तंतोतंत खरे ठरणार आहेत. मोदीच्या झंझावाती प्रचाराने संपूर्ण देश ढवळून निघाला. महागाई, भ्रष्टाचार, दलित, महिलांवरील अत्याचार थांबविण्यात काँग्रेस आघाडी सरकारला अपयश आल्याने देशातील जनता संतप्त होती. या सरकारकडून न्याय मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळेच मतदानातून त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त झाला. १९७७ नंतर काँग्रेसविरोधी मोठी लाट देशात आली असून, या लाटेत काँग्रेस भुईसपाट होईल, असा दावाही त्यांनी केला. आगामी मोदी सरकारात आपणास चांगले कॅबिनेट खाते मिळावे, अशी महाराष्ट्रातील दलित समाजाची मागणी असल्याचे सांगून खा. आठवले म्हणाले, त्यामुळेच दलित समाजाला आर्थिक व सामाजिक न्याय मिळू शकेल.