लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरून सुरू झालेले राजकारण शिगेला पोहोचले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आठवले गट) कुलगुरूंच्या दालनातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला.विद्यापीठात मागील पंधरा दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीला विरोध आणि समर्थनार्थ विविध संघटना आंदोलने, निवेदने देत आहेत. आठवले गटातर्फे पुतळा उभारण्यासाठी मागील आठवड्यात प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या नेतृत्वात कुलगुरूंना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर आठ दिवसांत निर्णय घेण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्यामुळे नागराज गायकवाड, नितीन वाकेकर, कुणाल खरात, विशाल सोनवणे, अश्विन मेश्राम, मिथिल कांबळे आदींनी कुलगुरूंची भेट घेतली.यावेळी कार्यकर्त्यांनी कुलगुरू दालनातच शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा एका स्टूलवर बसवला. या पुतळ्याला हार घालत १९ फेब्रुवारीपर्यंत शिवाजी महाराजांचा पुतळा विद्यापीठात उभारला नाही, तर रिपाइं स्वखर्चाने पुतळा उभारेल, अशा आशयाचे निवेदन दिले.
आठवले गटाने बसवला कुलगुरूंच्या दालनात पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:49 IST