पावसाची अजब तऱ्हा....
By Admin | Updated: August 24, 2014 00:35 IST2014-08-24T00:35:28+5:302014-08-24T00:35:28+5:30
परभणी : दीड ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रथमच शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. परंतु हा पाऊस खंड स्वरुपाचा होता.

पावसाची अजब तऱ्हा....
परभणी : दीड ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रथमच शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. परंतु हा पाऊस खंड स्वरुपाचा होता. परभणी तालुक्यात १४ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी केवळ शहर आणि परिसरातच हा पाऊस झाला आणि अनेक खेड्यांमध्ये शुक्रवारी पाऊसच झाला नाही. पावसामसाच्या या अजब तऱ्हेमुळे पिकांचा धोका मात्र अजूनही कायमच आहे.
शुक्रवारी पहाटे ३.३० च्या सुमारास परभणी शहरासह परिसरात एक तास जोरदार पाऊस झाला. परंतु हा पाऊस परिसरातील मांगणगाव, सनपुरी, हिंगला, खादगाव, साटला, समसापूर, धारणगाव, मटकऱ्हाळा, दुर्डी, मुरुंबा या भागात झाला नाही. या भागातील पिकांची परिस्थिती अतीशय नाजूक आहे. दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या भागात मुख्यत्वे सोयाबीन, कापूस आणि मूग ही पिके शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत. पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली आहेत. सोयाबीनची वाढ खुंटली आहे तर मूग सुकत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पिक परिस्थिती गंभीर आहे. पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळी खोल जात आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस झाला नाही तर पिके मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शुक्रवारी पावसाच्या आगमनामुळे आशादायक चित्र निर्माण झाले असले तरी तालुक्यातील काही गावांमध्ये मात्र हा पाऊस झालाच नाही. त्यामुळे या भागातील पिकांची परिस्थिती अजूनही नाजूकच आहे. (प्रतिनिधी)
शनिवारी पावसाच्या सरी
शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परभणी शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. विशेष म्हणजे दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिंतूर रोडवर मध्यम स्वरुपाचा पाऊस होत असताना वसमत रोडवर मात्र थोडाही पाऊस नव्हता. साडेतीनच्या सुमारास वसमत रोड भागात पाऊस झाला. पावसाचे पुनरागमन झाले खरे परंतु खंड स्वरुपाचा हा पाऊस असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.