शिधापत्रिका तात्काळ वाटप करा

By Admin | Updated: September 3, 2014 01:09 IST2014-09-03T00:50:40+5:302014-09-03T01:09:00+5:30

जालना : शहरी व ग्रामीण भागात अन्न धान्य वितरण व्यवस्थेसाठी स्वत धान्य दुकानाची संख्या असावी. तसेच ज्या पात्र कुटुंबधारकांकडे शिधापत्रिका नाही

Assign ration card immediately | शिधापत्रिका तात्काळ वाटप करा

शिधापत्रिका तात्काळ वाटप करा


जालना : शहरी व ग्रामीण भागात अन्न धान्य वितरण व्यवस्थेसाठी स्वत धान्य दुकानाची संख्या असावी. तसेच ज्या पात्र कुटुंबधारकांकडे शिधापत्रिका नाही, अशा पात्र कुटुंबांना नवीन शिधापत्रिका त्वरित वितरण करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदार यांनी करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी येथे दिले.
जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आशाताई भुतेकर, अशासकीय समिती सदस्य विमलताई आगलावे सुनील बुलबुले, अण्णासाहेब भालेराव, दशरथ आठवे, जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक आदी उपस्थित होते.
अन्न धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यांना तसेच गावातील सरपंच यांनी एसएमएसव्दारे गावात होत असलेल्या अन्न धान्याच्या पुरवठयाबाबत कळविण्यात येते, हे चांगले उपक्रम असून यातही काही सुधारणा करण्याचे आवाहन केले. पालकमंत्री टोपे यांनी सर्व तहसीलदार यांनी रेशन दुकानावर अन्न धान्याचे दर फलक लावण्यात यावे.
तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील रेशन दुकानावर असलेल्या याद्याची पडताळणी करुन सदोष याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्या.
अपात्र कुटुंबातील नावे यातून वगळण्यात यावीत. राहीलेले पात्र कुटुंबांना नवीन रेशन कार्ड देण्याची कार्यवाही करावी, अन्न सुरक्षा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व तहसीलदार यांनी स्वत:हून लक्ष द्यावे, या योजनेतील अन्न धान्य स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यात आला आहे, या धान्याचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री टोपे यांनी केले. यावेळी गोदाम दुरुस्ती अहवाल, बॉयोमॅट्रिक प्रणालीव्दारे धान्य वाटप, रॉकेल वाटप या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी मागील बैठकीतील विषयावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. बैठकीस सर्व तहसीलदार उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक लाभार्थी शिधापत्रिकांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योनजांचा लाभ घेताना अनेक अडचणी येत आहेत. पुरवठा विभागाने नव्याने सर्वेक्षण करुन लाभार्थींना शिधापत्रिकांचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Assign ration card immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.