पूर्ववैमनस्यातून गुन्हेगाराचा गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:42+5:302021-02-05T04:19:42+5:30
औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार भरत ऊर्फ जॉन शंकर तिर्थे (वय २८, रा. जय भवानी नगर) याच्यावर कुख्यात ...

पूर्ववैमनस्यातून गुन्हेगाराचा गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला
औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार भरत ऊर्फ जॉन शंकर तिर्थे (वय २८, रा. जय भवानी नगर) याच्यावर कुख्यात गुन्हेगार शुभम जाट आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे २२ जानेवारीला रात्री ११ वाजता झाली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
भरत ऊर्फ जॉन शंकर तिर्थे हा मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळील जयभवानीनगर येथील गल्लीत राहतो. त्याचे आणि आरोपी शुभम जाट सोबत जुने भांडण आहे. दोघेही गुन्हेगार असल्याने त्यांच्यात पटत नाही. २२ जानेवारीला रात्री शुभम आणि त्याच्या दोन साथीदारांनी भरत ऊर्फ जॉनचे घर गाठले. त्याला घराबाहेर बोलवून रेल्वे स्टेशनच्या फलकाजवळ घेऊन गेले. जुना वाद उकरून काढत आरोपींनी जॉनसोबत भांडण सुरू केले. यावेळी त्यांनी लोखंडी रॉड आणि दांड्याने जॉनला बेदम मारहाण करून जखमी केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जॉनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन घरी आल्यावर जॉन याने मंगळवारी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेविषयी आरोपी शुभम जाट आणि दोन साथीदार विरुद्ध फिर्याद नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फौजदार घायाळ तपास करीत आहेत.