आसरडोह घोटाळा; आठ जणांवर ठपका
By Admin | Updated: May 9, 2015 00:55 IST2015-05-09T00:33:09+5:302015-05-09T00:55:57+5:30
बीड : धारुर तालुक्यातील आसरडोह व २० खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामात झालेला लाखोंचा घोटाळा अखेर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला आहे

आसरडोह घोटाळा; आठ जणांवर ठपका
बीड : धारुर तालुक्यातील आसरडोह व २० खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामात झालेला लाखोंचा घोटाळा अखेर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला आहे. राज्य जीवन प्राधिकरणच्या गुणवत्ता परीक्षण पथकाने घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करत तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांसह आठ जणांवर ठपका ठेवला आहे. त्यामुळे घोटाळेबाजांच्या अक्षरश: झोपा उडाल्या आहेत.
१९९९ मध्ये आसरडोह व २० खेडी पाणीयोजना मंजूर झाली होती. मात्र, या योजनेच्या कामात अनियमितता झाल्याच्या तक्रारी होत्या. कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविलेली ही योजना ‘पाण्या’त गेली. परिणामी आसरडोह व परिसरातील खेड्यांचा पाणीप्रश्न सुटला नाही.
दरवर्षी उन्हाळ्यात या भागातील रहिवाशांना डोक्यावर हंडा घेऊन शिवार पालथा घालावा लागण्याचे चित्र कायम आहे.
अनियमिततेचे आरोप व तक्रारी झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गुणवत्ता परीक्षण पथकाने २१ ते २४ आॅक्टोबर २०१३ या दरम्यान प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीचा अहवाल जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवांकडे सादर करण्यात आला आहे.
यांच्यावर कारवाई अटळ
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गुणवत्ता परीक्षण पथकाच्या अहवालात तत्कालीन कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता यांच्यासह देयकांची पडताळणी करणारे शाखा अभियंता, लेखा शाखेतील लिपीक, लेखापाल यांच्यावरही ठपका आहे.
प्रशासकीय कार्यवाही सुरु
जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव डॉ. हेमंत लांडगे यांनी घोटाळ्यात अडकलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश औरंगाबाद मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार लवकरच दोषारोपपत्र बजावण्यात येतील. (प्रतिनिधी)