छत्रपती संभाजीनगर : जयंती उत्सवा दरम्यान छेड काढल्या गेलेल्या मुलीचे आवाज ऐकू येत नसल्याने डीजे चालकाला पोलिसांनी आवाज कमी करण्यास सांगितला. त्यातून त्याने थेट पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्कीपर्यंत मजल मारली. सोमवारी रात्री ११.५० वाजता क्रांतीचौकात हा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी दीपक उत्तम दाभाडे (३८) व अजय भीमराव काकडे (३२,दोघेही रा. नागसेन नगर) यांच्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
क्रांतीचौक ते गुलमंडीपर्यंत, क्रांतीचौक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. या दरम्यान रात्री ११.५० वाजेच्या सुमारास कदीम मशिदीपासून काही अंतरावर २० वर्षांची मुलगी रडत होती. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी तत्काळ तिच्याकडे धाव घेत, धीर देत विचारपूस केली. तेव्हा तिने गर्दीत अज्ञाताने तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचे सांगितले. परंतु डीजेच्या आवाजात नीट ऐकू येत नसल्याने बगाटे यांनी जवळच्या डीजेचा आवाज कमी करण्यासाठी पोलिस अंमलदारांना पाठवले. तेव्हा अजय व दीपक यांनी अंमलदार उमेश आव्हाळे यांना धक्काबुक्की केली. त्यांची कॉलर पकडून लाठी ओढण्याचा प्रयत्न केला. दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक आयुक्त संपत शिंदे यांनी सांगितले. उपनिरीक्षक अशोक इंगोले अधिक तपास करत आहेत.