एशियाड बसने पर्यटक झाले अजिंठ्यास रवाना
By Admin | Updated: November 3, 2016 01:32 IST2016-11-03T01:20:11+5:302016-11-03T01:32:15+5:30
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणीसाठी देण्यात आलेल्या पर्यटन बसेसची पळवापळवी सुरूच आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्याने जादा बस

एशियाड बसने पर्यटक झाले अजिंठ्यास रवाना
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणीसाठी देण्यात आलेल्या पर्यटन बसेसची पळवापळवी सुरूच आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्याने जादा बस म्हणून अजिंठ्याची वातानुकूलित पर्यटन बस पुण्याला पाठविण्यात आली. तर पर्यटकांना चक्क एशियाड बसने अजिंठ्याला रवाना करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला.
औरंगाबाद शहरातून गेली अनेक वर्षे पर्यटकांना वेरूळ, अजिंठा लेणी येथे जाण्यासाठी एस. टी. महामंडळाची साधी बस किंवा खाजगी वाहतूक साधनांचा आधार घ्यावा लागत होता. विदेशी पर्यटकांसह मोठ्या शहरातून येणाऱ्या पर्यटकांना अनेकदा ‘एसटी’ने प्रवास करणे गैरसोयीचे वाटते. शहरात येणाऱ्या पर्यटकांना चांगली सेवा मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला. जिल्हा नियोजन समितीने पर्यटन विकासासाठी दोन वातानुकूलित बस खरेदी करण्यासाठी १.८० कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून खरेदी करण्यात आलेल्या दोन पर्यटन बस १५ आॅक्टोबर २०१५ पासून वेरूळ आणि अजिंठ्यास जाणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत दाखल झाल्या. प्रारंभी या बसेसच्या प्रचाराअभावी पर्यटकांचा प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे पर्यटक नसल्याचे कारण पुढे करून या बसेस थेट पुण्याला सोडण्याचा प्रकार सुरू झाला. हा प्रकार काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे.
नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त शहरातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सुटीच्या कालावधीत पुणे मार्गावरील ‘एसटी’ची शिवनेरीसह प्रत्येक बस प्रवाशांनी भरून जाते. दिवाळीच्या सुट्यानंतर परतीच्या प्रवासानिमित्त हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सध्या अजिंठा, वेरूळ लेणीला भेट देणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. असे असताना पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी पर्यटन बस रवाना करण्यात आली. परंतु ही बस वेळेवर परत आली नाही. त्यामुळे बुधवारी ऐनवेळी एशियाड बसमधून अजिंठ्याला जाण्याची वेळ पर्यटकांवर आली. पर्यटन बस ज्या उद्देशासाठी देण्यात आली आहे, त्या उद्देशाला वेळोवेळी पायदळी तुडविले जात आहे. शिवाय लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे ही बस लवकर भंगार होण्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे हा प्रकार थांबविण्याची मागणी पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे.