आष्टी, माजलगावात रास्ता रोको
By Admin | Updated: May 21, 2017 23:51 IST2017-05-21T23:50:49+5:302017-05-21T23:51:25+5:30
आष्टी/ माजलगाव : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल तिडके या माथेफिरु विरूद्ध जिल्हाभरातून संताप व्यक्त होत आहे.

आष्टी, माजलगावात रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी/ माजलगाव : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल तिडके या माथेफिरु विरूद्ध जिल्हाभरातून संताप व्यक्त होत आहे. सोमवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, गावागावात बंदचे फलक झळकू लागले आहेत. तत्पूर्वी रविवारीच पांढरी (ता.आष्टी) व माजलगाव येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
विठ्ठल तिडके याने एका व्यक्तीशी भ्रमणध्वनीवरुन साधलेल्या संवादात महापुरुषांबद्दल अर्वाच्च शब्दप्रयोग केले. ही आक्षेपार्ह ‘व्हाईस क्लिप’ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिडकेला कठोर शासन करावे यास मागणीसाठी रविवारी आष्टी तालुक्यातील पांढरी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी बीड - अहमदनगर राज्य मार्गावर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. संपूर्ण गाव आंदोलनात उतरले होते.
निषेध म्हणून आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती हातावर बांधल्या होत्या. तब्बल दोन तास राज्यमार्ग ठप्प झाला होता. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी नायब तहसीलदार प्रदीप पांडूळे यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे शिवाजी चौक परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. आठवडी बाजारचा दिवस असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.
आजच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
बीड : महापुरूषांबद्दल विठ्ठल तिडके नामक माथेफिरूने अपशब्द वापरून अश्लिल भाषेत केलेल्या संवादामुळे सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. या माथेफिरुवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी जिल्हा बंदची हाक दिली आहे. बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विविध पक्ष- संघटनांतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे संतोष जाधव, नितीन बावणे, शरद चव्हाण, राहुल वाईकर, बापूसाहेब शिंदे, धनंजय शेंडगे, पंजाबराव येडे, शिवाजी शिंदे, जनार्दन शिंदे, संतोष डोंगरे, सुसेन नाईकवाडे, रवींद्र हावळे, प्रदीप बहार, मधुकर शेळके, दयानंद गायकवाड, गोपाळ धांडे, विलास शिंदे, विकास होके, पवन कुडके, प्रवीण तेलप, विनोद चव्हाण, निशांत घुमरे, अमोल बागलाने, नितीन बागलाने, अजित मुळूक, दादा उगले आदींनी दिला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जि.प. सदस्य अॅड. प्रकाश कवठेकर, मराठा क्लबचे अशोक सुखवसे यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला असून बंदला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. जय भगवान महासंघाचे जिल्हाप्रमुख बप्पासाहेब घुगे यांनीही बंदला पाठिंबा दर्शविला आहे. ट्रकमालक- चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय काकडे यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांतर्फे शांततेचे आवाहन
महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल रामकिसन तिडके (रा. कुंडी ता. जळकोट, जि. लातूर) यास पोलिसांनी रविवारी दुपारी जेरबंद केले. नागरिकांनी शांतता बाळगावी असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.