आष्टी, गेवराई रात्रीपासून अंधारात

By Admin | Updated: June 6, 2014 01:03 IST2014-06-06T00:23:01+5:302014-06-06T01:03:24+5:30

आष्टी/कडा/ गेवराई: बुधवारी सायंकाळी आष्टी तालुक्यासह गेवराई शहराला वादळी वार्‍याने झोडपले. यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब पडले.

Ashti, Geavarai in the dark from the night | आष्टी, गेवराई रात्रीपासून अंधारात

आष्टी, गेवराई रात्रीपासून अंधारात

आष्टी/कडा/ गेवराई: बुधवारी सायंकाळी आष्टी तालुक्यासह गेवराई शहराला वादळी वार्‍याने झोडपले. यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब पडले. तर झाडेही उन्मळून पडली. खांब पडल्याने अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली.
आष्टी तालुक्यात बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस झाला. वार्‍यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब पडले. तालुक्यात तब्बल पन्नास ते साठ खांब पडल्याने तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. यामुळे बुधवारी रात्री आष्टी शहरासह तालुक्यातील १७७ गावे व ८०० वाड्यांवरील ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली,
आष्टी, कड्यासह बीडसांगवी, कारखेल, गौखेल, गंगादेवी, शेडाळा, सावरगाव, घाटापिंप्री, धामणगाव, देवळाली या परिसरातही विद्युत खांब पडले असून अनेक ठिकाणी तारा एकमेकांना चिकटलेल्या आहेत. यामुळे स्पार्र्कींग होऊन विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे.
बुधवारी सायंकाळपासून बंद असलेला विद्युत पुरवठा गुरुरवारी सायंकाळी ४ पर्यंतही सुरू करण्यात आला नव्हता.
गांभिर्याची बाब म्हणजे तालुक्यातील एकाही गावात विद्युत पुरवठा दुरूस्त करण्यासाठी किंवा नेमका बिघाड कोठे झाला याची माहिती घेण्यासाठी महावितरणचा एकही अधिकारी फिरकला नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांना दिवसभर अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तालुक्यात ज्यावेळी विद्युत बिघाड होतो. त्यावेळी संबंधित अधिकारी बिघाड वेळेवर दुरूस्त करीत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केला आहे.
विद्युत पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त झाले होते. यामुळे बंद असलेला विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी सचिन वाघुले, संजय खंडागळे, शिवा शेकडे यांनी केली आहे.
या संदर्भात कनिष्ठ अभियंता रणधीर खंडागळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून वारंवार संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाने गेवराई शहरालाही झोडपले. शहरातील अनेक भागातील ताराही तुटल्या होत्या. वार्‍यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाले तर काही ठिकाणी रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडले. यामुळे गेवराई शहरात रात्रभर विद्युत पुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली. शहरातील बंद असलेला विद्युत पुरवठा गुरुवारी सकाळी सुरू करण्यात आला. या नैसर्र्गिक आपत्तीने सामान्यांसह महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे.
कोलमडलेले विद्युत खांब लवकरच दुरूस्त करण्यात येणार असल्याचे सहायक अभियंता एस.आर. सारडा यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Ashti, Geavarai in the dark from the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.