आषाढी वारी उत्सवाची तयारी
By Admin | Updated: July 5, 2014 00:44 IST2014-07-04T23:50:00+5:302014-07-05T00:44:58+5:30
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव हे गाव प्रतिपंढरपूर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. येत्या ९ जुलै रोजी देवशयनी एकादशी निमित्ताने भव्य यात्रा भरते.
आषाढी वारी उत्सवाची तयारी
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव हे गाव प्रतिपंढरपूर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. येत्या ९ जुलै रोजी देवशयनी एकादशी निमित्ताने भव्य यात्रा भरते. हजारो भाविक नर्सी येथे संत नामदेव दर्शनासाठी येतात. त्यांच्या संरक्षणासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून यंदा जादा बंदोबस्त मागविला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली.
बंदोबस्तात ११ अधिकारी, ७४ कर्मचारी, १५ महिला कर्मचारी, १० शहर वाहतूक शाखेचे पोलिस, राज्य राखीव दलाचे ३० जवान तैनात केले जाणार आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कार्यालय हिंगोली, प्राथमिक आरोग्य केंद्र, बिनतारी संदेश यंत्रणा, पोलिस मुख्यालयातून राहोट्या, बॅरिकेटस्, दुर्बीण यांची मागणीही केली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसेस सोडण्याची मागणी व संत नामदेव मंदिराजवळून जाणाऱ्या देवूळगाव, कडती, जवळा या बसेसचा मार्ग बदलून घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
सा. बां. चे काम सुस्तावले
नर्सी येथे आषाढी वारीसाठी भाविकांना रस्त्यावरून चालण्यासाठी चांगला रस्ता नाही. जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे वाहने रस्त्याच्या बाजूला उभे करण्यास जागाच उरली नाही. वाहन कुठे उभे करावे? असा प्रश्न वाहतूकदारांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
आरोग्य पथकाची तयारी
नर्सीत येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरविण्याच्या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्राकडून एक पथक तयार करण्यात आले आहे. त्यात
डॉ. एस. पी. परदेशी, डॉ. गोरे, दहातोंडे, भुजबळे यांचा समावेश आहे. उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर औषधीसाठा उपलब्ध असल्याचे
डॉ. परदेशी यांनी सांगितले.
दिवसभर वीजपुरवठा राहणार
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नर्सी येथील कनिष्ठ अभियंता जी. के. रनवीर यांच्याशी संपर्क साधला असता नामदेव मंदिराजवळील वीजपुरवठा दिवसभर सुरळीत राहील, असे त्यांनी सांगितले.
संस्थानच्या हद्दीतील स्वच्छतागृह चालू ठेवण्याची मागणी
नर्सी नामदेव संस्थानच्या जागेत २ वर्षीपासून स्वच्छतागृहाचे बांधकाम झाले आहे; परंतु त्याचा वापर होत नाही. भाविकांच्या सोयीसाठी हे स्वच्छतागृह चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दर्शनबारीची असुविधा
शासनाकडून ३५ लाख खर्च करून संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांना त्रास होवू नये म्हणून रस्ता तयार करण्यात आला; परंतु पाऊस, पाणी यापासून बचाव करण्यासाठी अद्याप सुविधा नाहीत भक्तांना याचा सामना करावा लागत आहे. शासन, प्रशासनाने संस्थानच्या कामास गती नर्सीचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
संत नामदेव मंदिर गर्दीने फुलणार
भक्तांचे दर्शन सुलभ होण्यासाठी वेळ निश्चिती करून दर्शन रांग तयार करण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांच्या सेवेसाठी नामदेव संस्थान, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील स्वयंसेवक तयार राहणार आहेत.
संत नामदेव मंदिराच्या मागे विठ्ठलाचे भव्य मंदिर व सभागृह बांधण्यासाठी २९ लाख ७३ हजारांची मंजूरी मिळाल्यानंतर हे काम २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने या कामाची निविदा उशिरा निघाली व कामास पाहिजे तेवढी गती मिळाली नाही. यात ६० लाखांची गुंंतवणूक झाली असल्याचे सांगण्यात आले. परंतु ही रक्कम योग्य वेळेत वापरली नाही म्हणून परत गेल्याचे समजले हे काम अधुरे राहिलेले आहे.