अस्सा नवरा हवा गं बाई !
By Admin | Updated: March 15, 2015 00:40 IST2015-03-15T00:20:29+5:302015-03-15T00:40:18+5:30
आपला जोडीदार निवडताना तो कसा असला पाहिजे, हे सांगताना बीडच्या तरूणींनी तो इम्प्रेस करणारा असला पाहिजे आणि रंगरूपापेक्षाही मनापासून प्रेम करणारा असला पाहिजे

अस्सा नवरा हवा गं बाई !
आपला जोडीदार निवडताना तो कसा असला पाहिजे, हे सांगताना बीडच्या तरूणींनी तो इम्प्रेस करणारा असला पाहिजे आणि रंगरूपापेक्षाही मनापासून प्रेम करणारा असला पाहिजे, असे सांगत आपल्या मनातील राजकुमाराविषयीच्या नेमक्या कल्पना मांडल्या. मनाजोगता जोडीदार मिळावा, ही प्रत्येक तरूणीचीच अपेक्षा असते. परस्परांमधील विश्वासालाही या तरूणींनी सर्वाधिक प्राधान्य दिले. जोडीदाराने आपल्यावर विश्वास दाखविला पाहिजे आणि त्याच्यावरही आपला तितकाच विश्वास असला पाहिजे, असेही या तरूणींनी आवर्जून सांगितले. परस्परांच्या कुटुंबियांना आदराने वागविले पाहिजे, यावर सर्वच तरूणींचे एकमत झाले. सर्वात महत्त्वाचा मुद्दा या पाहणीतून समोर आला तो एकमेकांविषयी पूर्णपणे पारदर्शकता असण्याचा. एकमेकांच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, यावरही या तरूणी ठाम असल्याचे दिसल्या.
शब्दांच्याही पलिकडले !
शब्दांच्याही पलिकडले जाणून घेणारा जोडीदार असावा, असे मत ९० टक्के तरूणींनी नोंदविले. आपण काही भावना व्यक्त न करताही त्याला आपल्या मनातील भावना कळल्या पाहिजेत, असे सांगताना एका तरूणीने आपल्या इच्छा त्याच्याशी बोलून दाखविण्यापेक्षा त्यानेच त्या ओळखल्या पाहिजेत आणि त्या पूर्णही केल्या पाहिजेत, असे सांगतानाच किमान एखादी इच्छा पूर्ण करताच आली नाही तर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तरी केला पाहिजे, असेही ती सूचकपणे म्हणाली.
निर्णयात लुडबुड नको !
विवाहानंतर आपल्याला काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यात त्याने लुडबुड करू नये, असे ७२ टक्के तरूणींना वाटते. त्यांनी आपल्याला स्वतंत्रपणे काही निर्णय घेऊ द्यावेत असे सांगताना या तरूणींनी नोकरीचा निर्णय आणि शिक्षण पुढे सुरू ठेवण्याच्या निर्णयावर अधिक भर दिला. सेल्फ डिसिजन घेण्याला या तरूणींनी प्राधान्य दिले. कोणत्याही गोष्टीचे कंम्पलशन नसावे, असेही त्यांना वाटते. अमुक गोष्ट केली पाहिजे आणि अमुक गोष्ट करू नये, असे सल्ले देणारी पोपटपंची या तरूणींना मान्य नाही. २८ टक्के तरूणींनी मात्र विवाहानंतर आपण आपल्या जोडीदाराने जे निर्णय घेतलेले असतील, त्यातच धन्यता मानण्यात आपला आनंद असल्याचे सांगून टाकले.
आपला जोडीदार हा समंजस असावा आणि तो दिलदार असावा, असे सांगतानाच ९६ टक्के तरूणींनी तो ओपन मांईडेड असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याला सामाजिक भान असावे आणि उठसूट बंधणे नसावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
४८ टक्के मुलींना मात्र आपल्या जोडीदाराचा आपल्यावर धाक असला पाहिजे, आणि आपल्याला त्याची आदरयुक्त भीतीही वाटली पाहिजे, असे सांगितले.
४जोडीदाराने भावना समजून घेतल्या पाहिजेत. उगीचच बंधानांचा अतिरेक नको, असेही मुलींना वाटते.४
जोडीदार निवडताना त्याचा व्यवसाय हा महत्त्वाचाच ठरतो. ही निवड करताना त्याचा व्यवसाय काय असला पाहिजे, या प्रश्नावर केवळ १ टक्के तरूणींनी शेतकरी असला तरी चालेल, असे सांगितले. ६ टक्के तरूणींनी तो उद्योजक असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली तर ९३ टक्के मुलींनी नोकरी असणारा जोडीदारच हवा, असा आग्रह धरला. शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्या ९९ टक्के मुलींनी त्याला शेती असावी, पण तो शेतात काम करणारा नसावा, अशीही पुष्टी जोडली.
४ या प्रश्नाला जोडूनच त्याचा आर्थिक स्तर कसा असावा, असा प्रश्न केल्यानंतर जेमतेम आणि गरजेइतकी कमाई असली तरी चालेल, असे म्हणाऱ्या तरूणी ८५ टक्के इतक्या होत्या. पैसेवालाच आणि आर्थिक संपन्न असला पाहिजे, असे ठामपणे सांगणाऱ्या ६ टक्के मुली होत्या तर चांगले जीवन जगता यावे, इतके पैसे त्याने कमावले पाहिजेत, असे सांगणाऱ्या ९ टक्के तरुणी होत्या.