परदेशी फळांची लातूरच्या बाजारपेठेत आवक
By Admin | Updated: April 28, 2015 00:29 IST2015-04-28T00:16:35+5:302015-04-28T00:29:54+5:30
लातूर : लातूरच्या बाजारात परदेशी फळे दाखल झाली आहेत़ उन्हाळ्याचा हंगाम सुरु असल्याने या फळांना मागणी वाढली आहे़ त्यासोबतच आंबा, टरबूज, खरबूजाची आवक मोठ्या प्रमाणात आहे़

परदेशी फळांची लातूरच्या बाजारपेठेत आवक
लातूर : लातूरच्या बाजारात परदेशी फळे दाखल झाली आहेत़ उन्हाळ्याचा हंगाम सुरु असल्याने या फळांना मागणी वाढली आहे़ त्यासोबतच आंबा, टरबूज, खरबूजाची आवक मोठ्या प्रमाणात आहे़
आफ्रिकन पेरु, न्युझिलंडचे कीवी, वॉशिंग्टनचे हिरवे सफरचंद, कॅलिफोर्नियाचे अंगूर, आफ्रिकन प्लंब्ज (आलुबुखार), इजिप्तची संत्री, अमेरिकन सफरचंद, थायलंडची चिंच अशा विविध परदेशी फळांची रेलचेल बाजारात दिसत आहे़ भारतीय प्रदेशातील फळांचा हंगाम ओसरल्यानंतर परदेशातील काही फळे आयात केली जातात़ काश्मीर व हिमाचल प्रदेशातील सफरचंदांचा हंगाम संपल्यानंतर इजिप्त व अमेरिकेतील सफरचंद बाजारात आले आहेत, अशी माहिती बागवान व्यवसायिकांनी दिली़ ही परदेशी फळे सुमारे ३०० रुपये किलो दराने असून, आठवड्याला १०० ते २०० किलोची आवक होत असल्याची माहिती बरकत बागवान, राजू बागवान, शबीर बागवान, जुहूर बागवान, कालिदास शिंदे, बापू कांबळे, इम्रान शेख आदींनी सांगितले़ या परदेशी फळासोबतच लातूरच्या बाजारात आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे़ हापूस, पायरी, लालबाग, दशहरी, तोतापरी, मल्लीका अशा प्रकारच्या आंब्यासोबतच केशर व गावरान आंब्याचीही आवक मोठ्या प्रमाणात आहे़ टरबूज, खरबूज, अननस, चिकू, संत्रा, मोसंबी आदी फळांचीही मोठी आवक बाजारात आहे़ (प्रतिनिधी)