गणाधिपतीचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:59 IST2018-09-14T00:58:49+5:302018-09-14T00:59:05+5:30
‘मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया’चा गजर, ढोल-ताशांच्या दणदणाटामुळे निर्माण झालेला जोश, जल्लोषात गुरुवारी गणाधिपतीचे थाटात आगमन झाले

गणाधिपतीचे आगमन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया’चा गजर, ढोल-ताशांच्या दणदणाटामुळे निर्माण झालेला जोश, जल्लोषात गुरुवारी गणाधिपतीचे थाटात आगमन झाले. गणेश मंडळांप्रमाणेच घरोघरी श्रींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. विघ्नहर्त्याच्या येण्यामुळे शहरात नवचैतन्य निर्माण झाले.
सुखकर्त्याच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी जय्यत तयारी केली होती. मूर्तिपूजा व प्रसादाचे साहित्य विक्रीसाठी पहाटेच बाजारपेठा उघडल्या होत्या. मूर्ती खरेदीसाठी जिल्हा परिषद मैदान, सेव्हनहिल ते गजानन मंदिर रस्ता, टीव्ही सेंटर परिसरात मोठी गर्दी उसळली. सकाळी ११ वाजता राजाबाजार येथील ग्रामदैवत संस्थान गणपतीची आरती करून शहरात ९४ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. अनेक गणेशभक्त गांधी टोपी, नेहरू शर्ट, पायजमा अशा पारंपरिक वेशभूषेत श्री गणेशाला घेण्यासाठी आले होते. बालगणेश मंडळांतील मुले दोन-चार ढोल ताशे वाजवत आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन जाताना दिसून आले.