सेना जि.प.सदस्य पतीचा पं.स.त राडा

By Admin | Updated: April 8, 2015 00:49 IST2015-04-08T00:35:39+5:302015-04-08T00:49:30+5:30

जालना : मग्रारोहयो चे मस्टरची देयके देण्यासाठी शिवसेना जि.प. सदस्या सरला वाडेकर यांचे पती तथा जामवाडी येथील सरपंच सुधाकर वाडेकर यांनी

Army Zilla Parishad's husband Pt Rada | सेना जि.प.सदस्य पतीचा पं.स.त राडा

सेना जि.प.सदस्य पतीचा पं.स.त राडा


जालना : मग्रारोहयो चे मस्टरची देयके देण्यासाठी शिवसेना जि.प. सदस्या सरला वाडेकर यांचे पती तथा जामवाडी येथील सरपंच सुधाकर वाडेकर यांनी येथील पंचायत समिती कार्यालयात फर्निचरची मोडतोड करून उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. ही घटना दुपारी १ च्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पं.स. व जि.प. कर्मचाऱ्यांनी दुपारी २ नंतर कामकाजावर बहिष्कार टाकला.
तत्पूर्वी वाडेकर यांनी दुपारी १२ च्या सुमारास जालना पं.स.चे गटविकास अधिकारी एस.डी. सूर्यवंशी यांची भेट घेऊन अन्य कामांबाबत चर्चा केली. सूर्यवंशी हे मग्रारोहयो कामांच्या तपासणीसाठी आलेल्या राज्य गुणवत्ता नियंत्रक पथकासोबत तेथून निघून गेले. त्यानंतर वाडेकर यांनी कर्मचाऱ्यांच्या दालनात जाऊन अचानक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली.
मग्रारोहयो मस्टरची देयके मिळत नाहीत, असे सांगून वाडेकर यांनी खुर्ची घेऊन कक्ष अधिकाऱ्यांच्या टेबलवर आदळली. त्यामुळे टेबलवरील काच फुटला, टेबलचे व खुर्चीचे नुकसान झाले. या प्रकारामुळे कार्यालयात मोठा गोंधळ उडाला.
या प्रकारामुळे उपस्थित महिला व पुरूष कर्मचारी मंडळी कार्यालयाच्या बाहेर आले. त्यावेळी वाडेकर यांनी ‘उद्या संगणकही फोडून टाकतो’, अशी धमकी देत तेथून काढता पाय घेतला. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील आपल्या सहकाऱ्यांना ही माहिती देताच, तेथील बहुसंख्य कर्मचारीही पं.स.च्या आवारात दाखल झाले.
सर्व कर्मचाऱ्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करून शासकीय कामकाजावर बहिष्कार टाकला. पं.स. चे गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची तयारी दर्शविली होती.
या घटनेचे पडसाद जिल्हा परिषदेत उमटल्यामुळे तेथील कामकाजही दुपारनंतर बंद झाले होते.
या प्रकारामुळे दुपारनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील कामकाज ठप्प झाले होते. अनेकांना कार्यालयात येऊन रिकाम्या हाताने परतावे लागले.
आज दिवसभर या प्रकाराची चर्चा होती. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, पी.टी. केंद्रे, कॅफो चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
या सर्व प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी या प्रकारणात मध्यस्थाची भूमिका बजावली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष मोहिते यांनीही त्यांना सहकार्य केले. त्यामुळे वाडेकर यांनी कर्मचाऱ्यांसमक्ष येऊन झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आपल्या गावातील मग्रारोहयो कामाचे देयक मिळणे अपेक्षित होते, असे ते म्हणाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार मागे घेतला.
याबाबत गटविकास अधिकारी एस.डी. सूर्यवंशी यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, मग्रारोहयोची आॅनलाईन देयके काढण्यास संपूर्ण देश पातळीवर तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. १ ते ७ एप्रिल या कालावधीत एकही देयक काढता आले नाही. मात्र पुढील काळात ते निघेल.

Web Title: Army Zilla Parishad's husband Pt Rada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.