सेना गद्दारांचं श्राद्ध घालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:44 IST2017-09-16T00:44:42+5:302017-09-16T00:44:42+5:30

सध्या पितृपक्ष सुरु आहे़ त्यामुळे अनेकांकडून श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम सुरु असून शिवसेनाही गद्दारांचं जिवंतपणी श्राद्ध घालणार आहे, अशी घणाघती टीका पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी गयारामांवर केली़

The army will revolt against the traitors | सेना गद्दारांचं श्राद्ध घालणार

सेना गद्दारांचं श्राद्ध घालणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सध्या पितृपक्ष सुरु आहे़ त्यामुळे अनेकांकडून श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम सुरु असून शिवसेनाही गद्दारांचं जिवंतपणी श्राद्ध घालणार आहे, अशी घणाघती टीका पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी गयारामांवर केली़
मनपा निवडणुकीत चिखलवाडी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले़ खोतकर म्हणाले, देशात सध्या वेगळ्या पद्धतीचा कारभार सुरु आहे़ आम्हीच या देशाचे तारणहार आहोत, या आविर्भावात काही मंडळी वावरत आहेत़ ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे़ त्यांना बुलेट ट्रेनची स्वप्ने दाखविली जात आहेत़ तर नोटबंदी हे पैसा कमाविण्याचे षड्यंत्र होते़ भाजपकडून नगरसेवकांना २५ लाख देण्याचे आमिष दाखविले जात आहे़ त्यातून गद्दारांची फौज निर्माण करण्याचे काम होत आहे, परंतु गद्दारांचे श्राद्ध कसे घालायचे हे शिवसेनेला चांगले माहीत आहे, असेही खोतकर म्हणाले़ तसेच नांदेडातच आयुक्तालय झाले पाहिजे अशी सेनेची भूमिका असून कुणाशी युती करायची अन् कुणाशी आघाडी हा निर्णय नंतर घेऊ, परंतु त्यासाठी महापौर हा शिवसेनेचा राहील ही अट राहणार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले़
आ़ हेमंत पाटील म्हणाले, सेना प्रचारात मागे आहे, असा अपप्रचारही केला जात आहे़ त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही़ काही स्वयंघोषित नेते पक्ष बदलत असतील, परंतु त्यामुळे फारसा फरक पडत नाही़ सेनेला आयाराम-गयारामांची गरज नाही़ त्यांना तिकिटेही दिली जाणार नाहीत़, असेही त्यांनी स्पष्ट केले़ यावेळी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी निलंगेकरांवर टीका करीत, आयुक्तालय त्यांनी रोखले़ नांदेड-मुंबई गाडीला विरोध करुन ती बीदरला नेली असे सांगितले़ पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत डॉ़अनिल पाटील, मनसेचे शहरप्रमुख महेश राठौर यांनी सेनेत प्रवेश केला़ यावेळी युवा सेनेचे सचिव अमोल कीर्तीकर, धोंडू पाटील, सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, मनोजराज भंडारी, प्रकाश मारावार, बंडू खेडकर यांची उपस्थिती होती़

Web Title: The army will revolt against the traitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.