सेनेतील वाद चव्हाट्यावर

By Admin | Updated: August 13, 2014 01:39 IST2014-08-13T01:00:15+5:302014-08-13T01:39:52+5:30

खुलताबाद : शिवसैनिकांनी संपर्कप्रमुख आ. विनोद घोसाळकर यांना घेराव घातला.

Army dispute | सेनेतील वाद चव्हाट्यावर

सेनेतील वाद चव्हाट्यावर

खुलताबाद : मतदारसंघातील कोणत्याही शिवसैनिकाला उमेदवारी द्या, मात्र बाहेरचा कोणीच नेता आमच्यावर लादू नका, अशी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी खुलताबाद येथे शिवसैनिकांनी पक्षशिस्त पायदळी तुडवीत बैठकीत संपर्कप्रमुख आ. विनोद घोसाळकर यांना घेराव घातला. दानवेंना त्यांच्याच समोर उघड विरोध केल्याने सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे दिसते. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्याआधीच उमेदवारीवरून मैदान चांगलेच तापले आहे. सेनेतील अंतर्गत वाद उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे.
गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची बैठक सेनेचे संपर्कप्रमुख आ. घोसाळकर यांच्या उपस्थितीत येथील भद्रा मारुती संस्थानच्या भक्त निवास सभागृहात घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी बाहेरच्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी करताच आ. घोसाळकर यांनी त्यांच्यावर दबाव टाकीत कार्यकर्त्यांना बोलू न देण्याचा प्रयत्न केला व असे चालणार नाही, असे म्हणाले. मात्र, शिवसैनिकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पदाधिकाऱ्यांच्या आक्रमकतेनंतर घोसाळकरांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली. या मतदारसंघात उमेदवारीवरून मोठी गटबाजी सुरू आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे येथून इच्छुक आहेत; परंतु ते मतदारसंघाबाहेरील असल्याने शिवसैनिकांचा त्यांना प्रचंड विरोध आहे.
त्यामुळे सर्व इच्छुकांनी एकत्र येऊन मतदारसंघातील कोणालाही द्या, परंतु बाहेरचा उमेदवार चालणार नाही, अशी आक्रमक भूमिका मांडली आहे. या बैठकीला माजी आ. अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सुहास दाशरथे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय तालुकाप्रमुख गणेश आधाने, शहरप्रमुख रवींद्र तंबारे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष माने, युवा सेनेचे तालुकाप्रमुख बंडू शिंदे, उपस्थित होते.
उमेदवारांच्या नावाची चाचपणी
शिवसेनेत सध्या फक्त उमेदवारीची चाचपणी करण्यात येत आहे. कुठल्याही नावाची चर्चा नाही. पक्ष चाचपणी करीत असताना माजी आ. अण्णासाहेब माने हे अशा वेळी आक्रमक वागून गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत.
बेशिस्तीला आवर घालत नाही
शिवसेनेत पक्ष शिस्तीचा भंग होत असून, भरसभेत असे वादंग होत असताना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे बेशिस्तीला आवर घालू शकत नाहीत असे चित्र आहे. दोन्ही घटना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याच उपस्थितीत घडल्या आहेत हे विशेष!
दानवेंना समोरासमोर विरोध
मंगळवारच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरच तीव्र विरोध केला. यावेळी अंबादास नलावडे, कारभारी जाधव, दत्ता मालोदे, प्रकाश पाटील, साईनाथ मातकर, कृष्णा भागडे, गुलाब कुचे यांनी आक्रमक भूमिका मांडली.
संपर्कप्रमुखांना अरेरावी
म्हणणे ऐकायचे नसेल तर आम्हीच बैठकीतून जातो, असे म्हणत शिवसैनिक बाहेर जायला निघाले तेवढ्यात सुहास दाशरथे यांनी सर्वांना शांत केले. मात्र त्यानंतरही मानेंच्या कार्यकर्त्यांनी चक्क आरेरावीची भाषा वापरल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Army dispute