सेना-भाजपात नगराध्यक्ष पदाची टोलवाटोलवी...!

By Admin | Updated: November 2, 2016 01:09 IST2016-11-02T01:07:42+5:302016-11-02T01:09:28+5:30

जालना नगर परिषद निवडणूक सध्या विविध कारणांनी गाजत आहे.

Army-BJP mayor's post of Tollwatolvi ...! | सेना-भाजपात नगराध्यक्ष पदाची टोलवाटोलवी...!

सेना-भाजपात नगराध्यक्ष पदाची टोलवाटोलवी...!

राजेश भिसे जालना
नगर परिषद निवडणूक सध्या विविध कारणांनी गाजत आहे. नगराध्यक्ष पद हे यंदा जनतेतून निवडले जाणार असून, पालिका हद्दीतील मतदारांची गणिते पाहता या पदाबाबत मात्र युतीत टोलवाटोलवी सुरू असल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनीही हे पद शिवसेनेने घ्यावे, असा आग्रह धरल्याने सेना आणि भाजपाचे नेते पेचात पडले आहेत.
युती आणि आघाडीशिवाय पालिकेत सत्ता मिळविणे शक्य नसल्याचे उमगल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडी आणि युती झाली. काँग्रेसमधून नगराध्यक्ष पदासाठी संगीता कैलास गोरंट्याल आणि पद्मादेवी भरतीया यांनी उमदेवारी अर्ज भरले आहेत. तर शिवसेनेतर्फे शोभाताई भास्कर अंबेकर आणि भाजपातर्फे सुशिलाताई भास्कर दानवे यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे सर्वांनी पक्षाचा बी फॉर्मदेखील दाखल केलेला आहे. मतांचे गणित जुळत नसल्याने सर्वच प्रमुख पक्षांचे नेते पेचात आहेत. धर्म आणि जातीनिहाय मतांचा विचार करता सेना आणि भाजपा नेत्यांची नगराध्यक्ष पदाबाबत टोलवाटोलवी सुरु असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला भाजपाने या पदासाठी आग्रह धरला असला तरी मतांचे गणित जुळत नसल्याचे दिसून येताच शिवसेनेने हे पद घ्यावे, असा भाजपा नेत्यांचा आग्रह आहे. एकूणच ही निवडणूक आणि यामागचे अर्थकारण या बाबी आवाक्याबाहेरच्या असल्याचे सेना नेत्यांचे म्हणणे आहे. युतीचा उमदेवार जाहीर होण्याची प्रतीक्षा आघाडीचे नेते करीत आहेत. युतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला की आघाडीची पुढील रणनिती ठरणार आहे. त्यामुळेच आघाडी करताना नगराध्यक्ष पद वाट्याला आलेल्या काँग्रेसने दोन अर्ज भरले आहेत. युतीचा उमेदवार ठरला की काँग्रेसही आपली भूमिका स्पष्ट करेल, असेच चित्र तूर्तास तरी दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर ही असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. तद्नंतरच नगरसेवक पदासाठी किती उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी कोण रिंगणात राहतो, याकडे जालनेकरांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Army-BJP mayor's post of Tollwatolvi ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.