शिपायावरच चालते आरोग्य उपकेंद्र !
By Admin | Updated: October 2, 2014 00:37 IST2014-10-01T23:54:35+5:302014-10-02T00:37:10+5:30
राजेंद्र नाटकर ,राक्षसभुवन गोरगरीबांना कमी खर्चात उपचार व्हावेत या उद्देशाने ठिकठिकाणी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहेत.

शिपायावरच चालते आरोग्य उपकेंद्र !
राजेंद्र नाटकर ,राक्षसभुवन
गोरगरीबांना कमी खर्चात उपचार व्हावेत या उद्देशाने ठिकठिकाणी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहेत. मात्र गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनच्या आरोग्य उपकेंद्रातील परिस्थिती भयावह आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने येथील शिपाईच आलेल्या रूग्णांवर उपचार करतात. याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात.
राक्षसभुवन हे गाव तीर्थक्षेत्र शनिच्या मंदिरामुळे ओळखले जाते. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्रांतर्गत तीन- चार मोठ्या गावांसह असंख्य वाड्या- वस्त्यांचा समावेश आहे. मात्र येथे येणाऱ्या रूग्णांना कुठल्याही सोयी- सुविधा पुरविल्या जात नाहीत. येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे व औषध निर्मात्याचे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. तसेच तीन परिचारीकांचा कारभार एका परिचारीकेवरच असल्याने त्याच्यावरही ताण येत आहे. ताण आल्याने या परिचारीका रूग्णांना त्रास देत असल्याचा आरोप होत आहे. या उपकेंद्रात औषधांचाही तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. उपस्थित अधिकारी, कर्मचारी उपकेंद्रात हजर राहत नसल्याने रूग्णांना खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. त्याचा आर्थिक भूर्दंडही बसत आहे. याबाबत उमापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोळुंके म्हणाले, रिक्त पदांसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ही पदे भरू व रूग्णांचे हाल होणार नाहीत याची काळजी घेऊ.