पुराणवस्तू संग्रहालय सौर दिव्यांनी उजळले
By Admin | Updated: September 29, 2014 00:40 IST2014-09-29T00:19:07+5:302014-09-29T00:40:05+5:30
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे असलेल्या श्री रामलिंगअप्पा लामतुरे पुराण वस्तू संग्राहालयामध्ये सुमारे १७ लाख ७१ हजार रूपये खर्च करून

पुराणवस्तू संग्रहालय सौर दिव्यांनी उजळले
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे असलेल्या श्री रामलिंगअप्पा लामतुरे पुराण वस्तू संग्राहालयामध्ये सुमारे १७ लाख ७१ हजार रूपये खर्च करून सौरदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे हा परिसर सौरदिव्यांनी उजळला आहे. परिणामी येथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.
शासनाने तेर येथे १९६७ मध्ये पुराणवस्तू संग्राहालयाची स्थापना केली. श्री रामलिंग खंडप्पा लामतुरे यांनी २३ हजार ८९२ विविध पुरातन वस्तू शासनाला विनामुल्य देण्यात आल्या. यामध्ये हस्त दंताच्या वस्तू, हाडाच्या वस्तू, शंखाच्या वस्तू, क्रेओलिनच्या मुर्त्या, महिला, धार्मिक संप्रदायाच्या प्रतिमा, सज्जा गौरी आदी वस्तू आहेत.
या पुरातण वस्तू पाहण्यासाठी तेर येथे देशी-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. अनेकवेळा पर्यटक आल्यानंतर येथे भारनियमन सुरू असते. अशावेळी संग्रहालयामध्ये अंधार पसरत असे. त्यामुळे पर्यटकांना पुराणवस्तू पहाताना गैरसोयीला तोंड द्यावे लागत होते. दरम्यान, पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून पुरातत्व विभागाने संग्रहालयामध्ये सौरदिवे बसविण्याचा निर्णय घेतला होता. सदरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. संग्रहालयाच्या मुख्य हॉलमध्ये वीस तर संग्रहालय परिसरामध्ये २५ स्ट्रीट लाईट बसविण्यात आल्या आहेत. यासाठी जवळपास १७ लाख ७१ हजार रूपये खर्च झाला आहे. सदरील सुविधा उपलब्ध झाल्याने आता पर्यटकांना भारनियमनाच्या काळातही पुराण वस्तू पहाता येणार आहेत. त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)