इटोलीच्या पाणीपुरवठ्यासाठी सव्वा कोटींची तरतूद मंजूर
By Admin | Updated: August 13, 2014 00:23 IST2014-08-13T00:02:51+5:302014-08-13T00:23:29+5:30
परभणी :जिंतूर तालुक्यातील इटोली येथील पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी २७ लाख ४९ हजार ४२२ रुपयांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

इटोलीच्या पाणीपुरवठ्यासाठी सव्वा कोटींची तरतूद मंजूर
परभणी :जिंतूर तालुक्यातील इटोली येथील पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी २७ लाख ४९ हजार ४२२ रुपयांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
इटोली येथे पाणीपुरवठा योजना सुरु करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे २ आॅक्टोबर २०१३ रोजी सादर करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २५ फेब्रुवारी २०१४ रोजी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सादर केला. त्यानुसार राज्य शासनाने १ कोटी २७ लाख ४९ हजार ४२२ रुपयांच्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने नुकताच काढण्यात आला. शासनाच्या नवीन आदेशानुसार या पाणीपुरवठा योजनेसाठी इटोली ग्रामपंचायतीला आता १० टक्के लोकवाटा भरण्याची गरज राहणार नाही. परंतु, या निधीतून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योेजनेची देखभाल व दुरुस्ती करण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची राहणार आहे.
प्रती घराला ९०० रुपये पाणीपट्टी
नव्याने सुरु होणारे योजना चालविण्यासाठी व योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणारा खर्चंइ भागविण्याकरीता संबंधित ग्रामपंचायतीने प्रती घर ९०० रुपयाप्रमाणे पाणीपट्टी आकारावी. या योजनेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी शासन निधी देणार नाही, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने घालून दिल्या अटी
या योजनेसाठी शासनाने १०० टक्के घरगुती नळ जोडण्या कराव्यात, योजनेचे काम दिलेल्या निधीमध्येच करावे, वाढीव निधी दिला जाणार नाही आदी अटी ग्रामपंचायतीला घालून दिल्या आहेत. या योजनेवर होणारा खर्च जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्र तथा राज्य निधीतून भागविण्यात यावा, असेही या बाबतच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.