निकष पायदळी तुडवत स्वीकृत सदस्यांच्या निवडी !
By Admin | Updated: May 24, 2017 00:32 IST2017-05-24T00:30:48+5:302017-05-24T00:32:35+5:30
लातूर : एखाद्या व्यक्तीकडे पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान अथवा अनुभव असेल, तर ती व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्य पदासाठी पात्र असते.

निकष पायदळी तुडवत स्वीकृत सदस्यांच्या निवडी !
हणमंत गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : एखाद्या व्यक्तीकडे पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान अथवा अनुभव असेल, तर ती व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्य पदासाठी पात्र असते. शिवाय, साहित्य, कला, क्रीडा, वैद्यकीय व्यवसाय, विधिज्ञ, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांत निपूण व्यक्तींना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य करावेत, असे निकष आहेत. मात्र या निकषांना पायदळी तुडवत केवळ कागदोपत्री मेळ घालून जातीय समीकरणांचाच विचार करून भाजप व काँग्रेसने स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
स्वीकृत सदस्य निवडीबाबतचा २८ फेब्रुवारी २०१२ चा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयानुसार वैद्यकीय, शिक्षण, सनदी लेखापाल, नगर परिषदेत मुख्याधिकारी किंवा महापालिकेत सहायक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम केलेल्या, सामाजिक कार्यात निपूण असलेल्या व्यक्ती स्वीकृत सदस्यासाठी पात्र असल्याचे म्हटले आहे. सोमवारी लातूर महापालिकेतील पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडी झाल्या. भाजपाकडून तीन आणि काँग्रेस पक्षाकडून दोन अशा पाच जणांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. त्यात एक-दोन जणांचा अपवाद वगळता शासन निकषात कोणी बसत असेल असे वाटत नाही. या निवडीबाबत विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, साहित्य क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा केली असता स्वीकृत सदस्य निवडीचे संकेत पाळले जात नसल्याची खंत व्यक्त झाली. थेट निवडणुकीतून अशा तज्ज्ञ व्यक्ती मनपात सदस्य म्हणून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीची सोय आहे. गतवेळी काही प्रमाणात निकष पाळले गेले होते. परंतु, यंदाच्या निवडीत मात्र ते पायदळीच तुडविले गेले आहेत, असा सूरही या तज्ज्ञांच्या चर्चेतून निघाला. स्वीकृत सदस्यांच्या निवडी करताना शासन निकषात बसविण्याचा केवळ मेळ या दोन्हीही पक्षांनी घातला आहे. सेवाभावी संस्थेतील पदाधिकारी आणि अनुभवी असा कागदोपत्री मेळ दोन्ही पक्षांनी घातला आहे.