चार गावांसाठी सव्वादोन कोटींच्या योजनांना मंजुरी
By Admin | Updated: September 11, 2014 00:06 IST2014-09-10T23:48:21+5:302014-09-11T00:06:14+5:30
परभणी: जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठ्यासाठी एकूण २ कोटी २४ लाख ७८ हजार ६९४ रुपयांच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

चार गावांसाठी सव्वादोन कोटींच्या योजनांना मंजुरी
परभणी: जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठ्यासाठी एकूण २ कोटी २४ लाख ७८ हजार ६९४ रुपयांच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
परभणी तालुक्यातील गोविंदपूर/ सारंगपूर येथील ग्रामपंचायतीने २६ जानेवारी रोजी गावात पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. तो प्रस्ताव नंतर जि.प.मार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार शासनाने या गावच्या पाणीपुरवठ्यासाठी ६३ लाख ७१ हजार ९०१ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या निधीतून ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजनेचे काम करावे लागणार असून योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीचीच राहणार आहे. या ग्रामपंचायतीला प्रतिकुटुंबाकडून ९०० रुपये पाणीपट्टीकर घ्यावा लागणार आहे. हा दर शासनाने ठरवून दिला आहे.
पूर्णा तालुक्यातील नऱ्हापूर येथील ग्रामपंचायतीने २४ नोव्हेंबर २०१२ रोजी जिल्हा परिषदेकडे गावात पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. नंतर तो जि.प.मार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार शासनाने ७६ लाख ९९ हजार ९०० रुपयांच्या या गावाच्या योजनेच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या निधीतून सदरील ग्रामपंचायतीला प्रतिकुटुंबाकडून ९०० रुपये पाणीपट्टी वसूल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. योजनेच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्रां.प.चीच राहणार आहे.
पूर्णा तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायतीने २६ मे २०१४ रोजी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. जि.प.मार्फत सादर केलेल्या या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे.
त्यानुसार या गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी ३५ लाख ३४ हजार १९० रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर या गावातील प्रति कुटुंबाला १८०० रुपये पाणीपट्टी वसूल करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)