पैठणी, हिमरू, कॉटन टेस्टिंगसह पाच क्लस्टरला मंजुरी
By Admin | Updated: May 19, 2015 00:53 IST2015-05-19T00:40:13+5:302015-05-19T00:53:42+5:30
संजय देशपांडे , औरंगाबाद पैठणी साडी, हिमरू शाल, बिदरी वर्क, आॅटोमोटिव्ह रबर काम्पोनंट आणि कॉटन टेस्टिंग या पाच क्षेत्रात क्लस्टर स्थापण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे

पैठणी, हिमरू, कॉटन टेस्टिंगसह पाच क्लस्टरला मंजुरी
संजय देशपांडे , औरंगाबाद
पैठणी साडी, हिमरू शाल, बिदरी वर्क, आॅटोमोटिव्ह रबर काम्पोनंट आणि कॉटन टेस्टिंग या पाच क्षेत्रात क्लस्टर स्थापण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. क्लस्टरच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्राचा (कॉमन फॅसिलिटी सेंटर) लाभ वरील क्षेत्रातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांना होणार आहे. उत्पादन खर्च कमी होण्याबरोबरच उत्पादकता वाढविण्यास क्लस्टरचा उपयोग होणार आहे. येत्या दीड वर्षात हे क्लस्टर प्रत्यक्षात कार्यरत होतील.
क्लस्टर उभारणीसाठी प्रकल्पाची मर्यादा पाच कोटी रुपयांची राहणार असून, राज्य सरकारचे ७० ते ८० टक्के अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) एका क्लस्टरसाठी दोन एकर जागा प्रचलित दराच्या ५० टक्के भावाने दिली जाणार आहे.
वरील पाच उद्योग क्षेत्रातील क्लस्टर स्थापन करण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बळवंत जोशी यांनी सांगितले.
हिमरूची घरघर थांबणार
चांगला परतावा मिळत नसल्याने हिमरू शालीची निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या घटत आहे. शालीला रंग देणे, स्टिचिंग, पॅकिंग करणे आदी कामांसाठी इचलकरंजीसारख्या ठिकाणी जावे लागत असल्याने उत्पादन खर्चही वाढत आहे.
क्लस्टरमुळे ही कामे औरंगाबादेतच करता येतील. परिणामी या व्यवसायातील तोटा कमी होणार आहे. पैठणी व्यवसायात कार्यरत असणाऱ्या महिला कारागिरांना तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यामुळे नवीन मुली या क्षेत्रात येण्यास तयार होत नाहीत. या पार्श्वभूमीवर ६० महिला एकत्र येऊन पैठण परिसरात पैठणी क्लस्टरची उभारणी करणार आहेत. या क्लस्टरसाठी दोन एकर जागा मिळणार असून, त्यापैकी एक एकर जमीन भाडेतत्त्वावर देता येणार आहे. उर्वरित जागेत दोन मजली इमारतीत हे क्लस्टर उभारले जाईल. त्कोशापासून धागा तयार करणे, धाग्याचे टिष्ट्वस्टिंग करणे व त्यांना रंग देणे ही कामे तेथे केली जातील.
पैठणी, हिमरू शाल, बिदरी वर्क, कॉटन टेस्टिंग आणि आॅटोमोटिव्ह रबर कॉम्पोनंट या क्षेत्रातील क्लस्टर निर्मितीचे प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केले आहेत. लघु उद्योगांनी जागतिक स्पर्धेत उतरावे, त्यांची उत्पादकता वाढावी यासाठी प्रत्येक क्लस्टरअंतर्गत कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारले जाणार आहे. क्लस्टर स्थापनेसाठी किमान दहा उद्योजकांनी एकत्र येऊन प्रस्ताव सादर करावेत.
- बळवंत जोशी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र
मराठवाड्यात ४५० पेक्षा जास्त जिनिंग प्रेसिंग उद्योग आहेत. कापूस तसेच कापसापासून तयार होणाऱ्या रुईचा दर्जा तपासणे, कापसाची स्ट्रेंथ, स्टेपल तसेच दोराचा दर्जा तपासण्यासाठी जिनिंग उद्योजकांना मुंबईच्या प्रयोगशाळेत जावे लागते. त्यामुळे पैसा व वेळेचा अपव्यय होत असतो. कॉटन टेस्टिंग क्लस्टरमुळे ही सर्व कामे औरंगाबादेत होतील.
आॅटोमोटिव्ह रबर काम्पोनंट क्लस्टरमुळे या क्षेत्रातील उद्योजकांना ‘इंटरमिक्स’ची सुविधा मिळणार आहे. बंदिस्त खोलीत ‘इंटरमिक्स’चे काम करण्याची सुविधा सध्या मोजक्याच बड्या उद्योगांकडे आहे. लघु उद्योजकांना ‘इंटरमिक्स’चे काम उघड्या जागेत करावे लागते.
४या प्रक्रियेत पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच; परंतु ही कामे करणाऱ्या कामगारांचे शरीर, हात कायम काळे होत असतात. स्नान केल्याशिवाय या कामगारांना जेवण करणे अथवा साधा चहा पिणे शक्य नसते. ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’मध्ये ‘इंटरमिक्स’ची सुविधा उपलब्ध होणार असल्याने या क्षेत्रातील लघु उद्योगांचा उत्पादन खर्च कमालीचा घटेल.