पानगावच्या पाणी योजनेस अखेर मंजुरी
By Admin | Updated: June 29, 2014 00:39 IST2014-06-29T00:25:21+5:302014-06-29T00:39:53+5:30
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील पानगावची पाणी पुरवठा योजना दरडोई खर्चाच्या निकषात बसत नव्हती.

पानगावच्या पाणी योजनेस अखेर मंजुरी
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील पानगावची पाणी पुरवठा योजना दरडोई खर्चाच्या निकषात बसत नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. अखेर शासनाने या योजनेला हिरवा कंदील दिला आहे. ५८ लाख ५७ हजार ७२९ रुपये इतक्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.
पानगाव येथील ग्रामस्थांच्या सोईसाठी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव २ हजार ९०८ रुपये एवढ्या वाढीव दरडोई खर्चाचा होता. परिणामी ही योजना दरडोई खर्चाच्या निकषात बसत नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेने सदरील पाणी योजनेचा प्रस्ताव राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे मान्यतेसाठी सादर केला होता. त्यावर शासनाने २ हजार ६०८ रुपये वाढीव खर्च असलेल्या या नळ पाणीपुरवठा योजनेच्या ५८ लाख ५७ हजार ७२९ रुपये इतक्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे पानगावचा पाणीप्रश्न सुटण्यास आता मदत होणार आहे.
‘पेयजल’ अंतर्गत खर्च
पानगावच्या पाणीपुरवठा योजनेवर होणारा खर्च हा जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्र अथवा राज्य शासनाच्या निधीतून करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
१०० टक्के घरगुती नळ जोडण्या बंधनकारक
योजना राबवित असताना स्त्रोतांचे बळकटीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्र्वांना व्यवस्थितरित्या पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी १०० टक्के घरगुती नळजोडण्यांही द्याव्या लागणार आहेत.
मंजूर किंमतीतच योजनेचे काम
पानगावची पाणीपुरवठा योजना ही दरडोई खर्चाच्या निकषात बसत नाही. असे असतानाही गावचा पाणी प्रश्न लक्षात घेवून सदरील योजनेला शासनाने हिरवा कंदील दिला आहे. मात्र, हे काम मंजूर किंमतीच्या मर्यादेत राहुनच करावे, अशी अट घातली आहे.