१ कोटी ३४ लाखांच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी
By Admin | Updated: March 10, 2017 00:27 IST2017-03-10T00:26:07+5:302017-03-10T00:27:25+5:30
लातूर : मनपा निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीने १ कोटी ३४ लाख रूपये शिलकीचे अंदाजपत्रकाला गुरूवारी मंजुरी दिली

१ कोटी ३४ लाखांच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी
लातूर : मनपा निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीने १ कोटी ३४ लाख रूपये शिलकीचे अंदाजपत्रकाला गुरूवारी मंजुरी दिली असून माजी राष्ट्रपती डॉ़ एपीजे अब्दुल कलाम शिक्षण प्रोत्साहन योजना, महात्मा बसवेश्वर विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना तसेच डॉ़बाबासाहेब आंबेडकर कुटुंब सुरक्षा योजनेत १६ हजार ११८ कुटुंबाचा कुटुंब प्रमुखांचा अपघात विमा उतरविण्यासाठी या शिलकी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे़
स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी हे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या बैठकीत सादर केले़ शासनाकडून मिळणारे अनुदान, केंद्र शासनाच्या विशेष अनुदानातून प्राप्त होणारा निधी, शहरातील पायाभूत सुविधा विकसित करणे, दळणवळण सुविधा निर्माण करणे, दलित वस्त्यांचा विकास, आरोग्य पर्यावरण संतुलन, रस्ते, नाल्या यांच्या निर्मिती, दिवाबत्ती सेवा या कामांवर खर्च करण्याचे नियोजन या अंदाजपत्रकात करण्यात आले असून, महसुली उत्पन्नात भांडवली कामासाठी तरतूद करण्यात आली आहे़ आगामी आर्थिक वर्षासाठी उत्पन्न व खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे. उत्पन्नातून खर्च वजा जाता १ कोटी ३४ लाख रूपये शिल्लक राहील, असे अंदाजपत्रक विक्रांत गोजमगुंडे यांनी स्थायीच्या बैठकीत सादर केले़ त्यावर सदस्यांनी सूचना करून या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली़
बैठकीला मनपा आयुक्त रमेश पवार, अॅड़ समद पटेल, राजा मणियार, चंद्रकांत चिकटे, रविशंकर जाधव, महादेव बरूरे, सुनीता चाळक, प्रा़ स्मिता खानापुरे आदी सदस्यांची उपस्थिती होती़