नऊ बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती
By Admin | Updated: November 13, 2014 00:50 IST2014-11-13T00:39:32+5:302014-11-13T00:50:27+5:30
उस्मानाबाद/कळंब : जिल्ह्यातील सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या कळंबसह ९ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नऊ बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती
उस्मानाबाद/कळंब : जिल्ह्यातील सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या कळंबसह ९ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदेश प्राप्त होताच बहुतांश प्रशासकांनी समित्यांचा कार्यभार स्वीकारला आहे. विद्यमान संचालक मंडळ आणि प्रशासकीय मंडळाची मुदत संपल्याने जिल्हा उपनिबंधकानी सदरील प्रशासक नेमण्याचा हा निर्णय घेतला.
जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी आठ तर मुरुम येथे एक अशा ९ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. यातील भूम, वाशी आणि परंडा या कृषी बाजार समित्यांवर प्रशासकीय मंडळ तर उर्वरित उस्मानाबाद, तुळजापूर, मुरुम, लोहारा, उमरगा आणि कळंब या सहा समित्यांवर संचालक मंडळ कार्यरत होते. या मंडळांची मुदत सरल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला होता. सदरील संस्थांची वाढीव मुदत १० नोव्हेंबर रोजी सरल्याने लागलीच ११ रोजी उपरोक्त नऊही संस्थांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता या समित्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला असून, सहा महिन्याच्या आत नवीन संचालक मंडळाच्या निवडीसाठी निवडणूक घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून बी.एन. वाघमारे, भूम ए.टी. सय्यद, परंडा एच.एस. कांबळे, उस्मानाबाद एस.टी. बडे, तुळजापूर बी.ए. शिंदे, मुरुम पी.एल. शहापूरकर, लोहारा एस.एन. गायकवाड, उमरगा एस.एस. कुलकर्णी आणि कळंब बाजार समितीचे प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) सी. पी. बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदेश मिळताच बनसोडे यांनी बुधवारी तातडीने पद्भार स्विकारला. (प्रतिनिधी)
कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यांची यापूर्वी पंचवार्षिक सर्वसाधारण निवडणूक २००८ मध्ये झाली होती. त्यानंतर पदभार घेतलेल्या दिनांकापासून पाच वर्षाचा कालावधी १० नोव्हेंबर २०१३ रोजी संपुष्टात आला होता. यानंतर निवडणुका न घेण्यात आल्याने ११ आॅक्टोबर २०१३ व ११ एप्रिल रोजी संपुष्टात आला होता. यानंतर निवडणुका न घेण्यात आल्याने ११ आॅक्टोबर २०१३ व ११ एप्रिल २०१४ रोजीच्या शासन आदेशान्वये सहा-सहा महिन्याची सदस्य मंडळास मुदतवाढ देण्यात आली होती. सदर वाढीव मुदतवाढही १० आॅक्टोबर रोजी संपलेली होती.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनयिमन) अधिनियम १९६३ कलम १४ (३) नुसार समिती सदस्यांचा पाच वर्षाचा कालावधी निर्धारित केला आहे. पदावधी संपण्यापूर्वी निवडणूक घेणे शक्य नसल्यास याच अधिनियमानुसार एक वर्षाचा पदावधी वाढविण्याचा अधिकार राज्य शासनास आहे. याशिवाय पाच वर्षाचा कालावधी किंवा वाढीव पदावधी संपला असल्यास याच अधिनियमातील कलम १५ (अ) नुसार सदस्य आणि पदे धारण करण्याचा अधिकार बंद करुन प्रशासक नेमण्याचा अधिकार सहकार विभागाला आहे. कळंब बाजार समितीची पंचवार्षिक व तद्नंतर वाढीव मिळालेली एक वर्षाची मुदत संपल्याने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) शिवाजी बडे यांनी उपरोक्त अधिनियमातील कलम १५ (अ) नुसार प्राप्त अधिकारानुसार कळंब बाजार समितीवर ११ नोव्हेंबरपासून प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा उपनिबंधकांनी कळंब बाजार समितीवर प्रशासक म्हणून कळंब येथील सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) सी.पी. बनसोडे यांची नियुक्ती केली आहे. सदर आदेश मिळताच बुधवारी बाजार समिती कार्यालयात जावून त्यांनी एकतर्फी पद्भार घेतला. यावेळी बाजार समिती सभापती लक्ष्मण थोरबोले उपस्थित नव्हते. तर बाजार समिती सचिव सूर्यकांत चव्हाण, सहकार अधिकारी ए.आर. सय्यद हे उपस्थित होते. सदर प्रशासकांची नियुक्ती ही सहा महिन्यांसाठी किंवा नवीन सदस्यांच्या गणपूर्ती होईल एवढ्या पहिल्या सभेपर्यंत राहणार आहे. याशिवाय प्रशासकांना सर्वसाधारण निवडणूक कार्यक्रम घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचीही सूचना आदेशात देण्यात आली आहे.