नगराध्यक्षपदासाठी अनिता सूर्यतळ यांचाच अर्ज
By Admin | Updated: July 12, 2014 00:48 IST2014-07-12T00:48:09+5:302014-07-12T00:48:09+5:30
हिंगोली : हिंगोलीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अनिता सूर्यतळ यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार

नगराध्यक्षपदासाठी अनिता सूर्यतळ यांचाच अर्ज
हिंगोली : हिंगोलीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अनिता सूर्यतळ यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार, हे निश्चित झाले आहे. मात्र या निवडीची घोषणा होण्यासाठी १५ जुलैची वाट पहावी लागणार आहे.
हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम १० जुलैपासून सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी कोणीही अर्ज दाखल केला नव्हता. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अनिता सदाशिव सूर्यतळ यांनी दुपारी १२ च्या सुमारास अर्ज पीठासन अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्याकडे दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत मावळते नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक गणेश लुंगे, जगजीतराज खुराणा, अॅड. भुक्तर, आमेर अली, अनिल नैनवाणी, बाबूराव कदम, आरेफ शेख, शकील शेख, नगरसेविका सुरेखा जयस्वाल, वसंताबाई लुंगे, निरगुणा बोथीकर, शरद जयस्वाल आदींची उपस्थिती होती.
त्यानंतर काँग्रेसच्या सदस्या आशाताई उबाळे या उमेदवारी दाखल करतील, अशी चर्चा होती; परंतु त्यांनी अर्ज दाखल केला नाही. विशेष म्हणजे नगरपालिकेत अनुसूचित जाती महिला प्रवर्गात अनिता सूर्यतळ व आशाताई उबाळे या दोनच सदस्या आहेत. आता नगराध्यक्षपदासाठी सूर्यतळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडीची घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे.
१५ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता अध्यक्ष निवडीची सभा होणार आहे. त्यावेळी सूर्यतळ यांची अधिकृत निवड जाहीर होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
उपनगराध्यक्षपदासाठी हिंगोलीत रस्सीखेच
नगराध्यक्षांची निवड बिनविरोध होणार असली तरी उपनगराध्यक्ष पदासाठी मात्र रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, माजी उपनगराध्यक्ष बिरजू यादव, नगरसेवक आमेर अली हे उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
कळमनुरी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३ उमेदवारांचे ४ अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्याधिकारी के. एम. वीरकुंवर यांनी दिली. नगराध्यक्षपदासाठी १० अर्जांची विक्री करण्यात आली. काँग्रेसच्या यासमीनबी शेख फारुक यांचे दोन अर्ज, मुख्तारबी हमीदुल्ला पठाण यांचा एक अर्ज तर सेनेच्या गिरीजाबाई बाबाराव खोडके यांचा एक असे एकूण ३ उमेदवारांचे चार अर्ज दाखल करण्यात आले. ११ जुलै रोजी दुपारी दोन वाजेनंतर आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. चारही अर्ज वैध ठरविण्यात आले असल्याचे वीरकुंवर यांनी सांगितले.
हिंगोली नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने फोडाफोडीचे राजकारण नाही.
हिंगोलीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असून, पालिकेत २८ पैकी राष्ट्रवादीच्या अनिता सूर्यतळ व काँग्रेसच्या आशाताई उबाळे या दोनच महिला या प्रवर्गातील आहेत.