आपेगावच्या पालखीस परवानगी नाकारली, संस्थान अध्यक्षाचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST2021-07-07T04:05:51+5:302021-07-07T04:05:51+5:30
पैठण : संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेल्या आपेगाव येथून दरवर्षी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर व त्यांच्या मातापित्यांची पालखी पंढरपूरला ...

आपेगावच्या पालखीस परवानगी नाकारली, संस्थान अध्यक्षाचा आत्मदहनाचा इशारा
पैठण : संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेल्या आपेगाव येथून दरवर्षी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर व त्यांच्या मातापित्यांची पालखी पंढरपूरला जात असते. मात्र कोरोनाने गतवर्षीपासून यात आडकाठी आली आहे. यंदा राज्य शासनाने मानाच्या पालख्यांना वारीसाठी परवानगी दिली असताना आपेगावच्या पालखीस परवानगी नाकारल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आम्हाला परवानगी द्या, नसता १२ जुलै रोजी आपेगाव येथील मंदिरात वारकऱ्यांसह आत्मदहन करू, असा इशारा आपेगाव मंदिराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी दिला आहे.
पैठण तालुक्यातील आपेगाव येथून पंढरपूर आषाढी वारीची गेल्या ८४२ वर्षांपासून परंपरा चालत आली आहे. या पालखीची शासनाच्या गॅझेटमध्येही नोंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा गतवर्षी खंडीत झाली. यंदा मात्र राज्य शासनाने मानाच्या दिंडीसहित आणखी दोन दिंड्यांना पंढरपूर वारीसाठी परवानगी देताना आपेगावच्या पालखीस परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी पत्रपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, वारकरी संप्रदायात मोलाचे स्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीस राज्य शासनाने परवानगी नाकारल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. पालखीस परवानगी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता. मात्र, याबाबत दखल घेण्यात आली नाही. यामुळे वारकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आमच्यासोबत १८ जिल्ह्यांतील वारकरी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
शासनाकडे केल्या या मागण्या
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी शासनाकडे वारीसाठी परवानगी मागताना खालील मागण्या केल्या आहेत.
पायी वारीचे आम्ही समर्थन करीत नाहीत. २५ वारकऱ्यांसह वाहनाने पंढरपूरला जाण्याची परवानगी द्या. पंढरपूर प्रवेश व प्रदक्षिणा नाकारली तरी चालेल, चंद्रभागेत स्नान करून आम्ही परत फिरू असे म्हटले आहे.
चौकट
२ जुलै रोजी झाले औपचारिक प्रस्थान
आपेगाव येथून पालखीचे २ जुलै रोजी पंढरपूर वारीसाठी औपचारिक प्रस्थान झाले असून पालखी आपेगाव येथील मंदिरात मुक्कामी आहे. शासनाने परवानगी दिली तर पालखी १८ जुलै रोजी मोजक्या वारकऱ्यांसह वाहनाने पंढरपूरकडे रवाना होईल. परंतु राज्य सरकारने आपला निर्णय १२ जुलैच्या आत घोषित करावा, अशी भूमिका ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी मांडली.