बेबनावाने चिंतेचे वातावरण

By Admin | Updated: September 23, 2014 01:35 IST2014-09-23T00:39:19+5:302014-09-23T01:35:08+5:30

जालना : आघाडी किंवा महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासंदर्भात मुंबई, दिल्लीत गांभिर्याने सुरू केलेल्या विचारमंथनामुळे या जिल्ह्यातील निवडणूक लढवू

Anxious anxiety environment | बेबनावाने चिंतेचे वातावरण

बेबनावाने चिंतेचे वातावरण


जालना : आघाडी किंवा महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासंदर्भात मुंबई, दिल्लीत गांभिर्याने सुरू केलेल्या विचारमंथनामुळे या जिल्ह्यातील निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मातब्बर पुढाऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून महायुती व आघाडीत जागा वाटपावरून मोठा ताणतणाव सुरू आहे. तो लवकरच निवळेल, असे अपेक्षित होते. विशेषत: सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह पदाधिकारी व मातब्बर पुढाऱ्यांना सुद्धा त्या ताणतणावाविषयी फारसे गांभीर्य वाटले नाही. मुंबई-दिल्लीतील आघाडी किंवा महायुतीच्या पुढाऱ्यांच्या बैठका, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांकडे या साऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले. जागावाटपावरून रस्सीखेच तर होणारच, असा सूर आवळून या साऱ्यांनी स्वकियांसह मित्रपक्ष सन्मानजनक तोडगा काढतीलच, असा विश्वास बाळगण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे मातब्बर पुढाऱ्यांनी मुंबई-दिल्लीतील त्या घडामोडींची दखलच घेतली नाही. आपले दैनंदिन कार्यक्रम सुरूच ठेवले. कार्यकर्त्यांसह माध्यमांनी युती किंवा आघाडीचे काय होणार, असा सवाल केला तर सारे काही ठिकठाक होईल, असा आशावाद व्यक्त करीत वर्षानुवर्षापासूनचे मित्रपक्षांचे ऋणानुबंध तुटणार नाहीत, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
या जिल्ह्यात हे चित्र रविवारी सायंकाळपर्यंत प्रकर्षाने दिसून आले. विशेषत: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पुढाऱ्यांनी एैक्यासह मनोमिलनाचे दर्शन घडविले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजीमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे.बोराडे, आ. संतोष सांबरे आदी पुढारी स्रेहमेळाव्यात रमले होते. २५ वर्षांपासूनच्या युतीतील ऋणानुबंधांच्या या पुढाऱ्यांनी गप्पाही रंगविल्या होत्या. युती सहजासहजी तुटणार नाही, हे धागे कायमचे बांधलेले आहेत, असे नमूद करीत दानवे व खोतकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर छातीठोकपणे दावे ठोकले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत या दोन्ही पुढाऱ्यांनी समन्वयातून सन्मानजनक तोडगा काढला व भगवा फडकवला सुद्धा.
या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासून युती तुटणार, या आशयाच्या बातम्या धडकू लागल्या तेव्हा महायुतीतील या मातब्बर पुढाऱ्यात कमालीची अस्वस्थता पसरली. सायंकाळी उशिरापर्यंत या पुढाऱ्यांनी मुंबई-दिल्लीतील श्रेष्ठींशी संपर्क साधून ताज्या घडामोडींची माहिती घेतली. काहीही करा, पण युती टिकू द्या, अशी विनवणीही केली. मतविभागणी परवडणारी नाही, असे ठणकावले सुद्धा. या पुढाऱ्यांकडून सायंकाळी उशिरापर्यंत युती टिकणारच, असे दावे होत होते.
याउलट मात्र त्या-त्या मतदारसंघातील इच्छूक कमालीचे सुखावले होते. स्वबळावर लढाच व आपले अस्तित्व दाखवून द्या, असा सूर या इच्छुकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे आवर्जुन व्यक्त केला. श्रेष्ठींनी आदेश दिला तर निवडणूक रिंगणात उतरू, असा दावाही ठोकला. युती तुटल्याचा कोणताही परिणाम आपल्या पक्षावर होणार नाही, असे हे इच्छूक छातीठोकपणे सांगत होते. (जिल्हा प्रतिनिधी)
महायुती व आघाडीतील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील मातब्बर पुढारी अपवाद अन्य इच्छुकांचे चेहरे कमालीचे उजळलेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत यातील काही इच्छुकांनी स्वबळावरच पक्ष लढणार, असा दावा ठोकून आपली उमेदवारी सुद्धा जाहीर केली. जालन्यातून राष्ट्रवादीचे काही पुढारी या पद्धतीचे दावे ठोकत होते. तर बदनापुरातून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लगेचच बैठक घेऊन स्वबळावर लढण्याचा संकल्पसुद्धा सोडला. परतूरमधून शिवसेनेचे कार्यकर्ते पूर्वीपासूनच स्वबळावर लढण्याचा नारा देऊन बसले आहेत. तेथील इच्छुकांसह कार्यकर्त्यांच्या आशा, आकांक्षा कमालीच्या उंचावल्या आहेत.
४भोकरदन व घनसावंगी या विधानसभा मतदारसंघात सामसूम जाणवली. शिवसेनेच्या स्थानिक पुढाऱ्यांनी भोकरदनमधून फारशी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. घनसावंगीतून मात्र भाजपकडून उमेदवारांचीही नावे चर्चेत आणण्यात आली. काँग्रेस कार्यकर्ते मात्र स्तब्ध भुमिकेत होते.

Web Title: Anxious anxiety environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.