माणसे जोडण्याचे काम अंकुशरावांनी केले
By Admin | Updated: April 3, 2017 23:16 IST2017-04-03T23:16:09+5:302017-04-03T23:16:49+5:30
वडीगोद्री : माणसे जोडण्याचे काम करण्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून अंकुशराव टोपे यांनी साखर कारखाने काढून शेतकरी विकासाचा ध्यास घेतल्याचे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.

माणसे जोडण्याचे काम अंकुशरावांनी केले
वडीगोद्री : माणसे जोडण्याचे काम करण्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून कर्मयोगी अंकुशराव टोपे यांनी साखर कारखाने काढून शेतकरी विकासाचा ध्यास घेतल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सोमवारी काढले.
अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या स्मारकाचे उद्घाटन व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, कारखान्याच्या अध्यक्षा शारदाताई टोपे, राजेश टोपे, जयदत्त क्षिरसागर, मुधकर चव्हाण, राजेंद्र शिंगणे, उद्योगपती बद्रीनारायण बारवाले, राहुल मोटे, आ. सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, डी. पी. सावंत, लक्ष्मण पवार, रामराव वडकुते, सुभाष झांबड, नारायण कुचे, कैलास गोरंट्याल, संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे, बदामराव पंडित, डोणगावकर, निसार देशमुख, सुरेश जेथलिया आदींची उपस्थिती होती.
पवार म्हणाले की, आज माझ्या भावना या संमिश्र आहेत. एकीकडे सहकार्याचे स्मरण तर दुसरीकडे माझे मन अस्वस्थ आहे. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी अंकुशराव लहान होते. आम्ही पंचेचाळीस वर्षे सोबत काम केले. त्यांनी समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. सर्व कामे ही चौकटीत राहून शिस्तबध्द पद्धतीने केली. कारखाने, शैक्षणिक संस्था, दूध संघ, सुतगिरणी अशा विविध सहकारी संस्था उभारल्या. मी स्वत: सुतगिरणी चालू शकलो नाही. परंतु अंकुशराव यांनी अतिशय यशस्वीपणे सुतगिरणी चालू ठेवली. आज महाराष्ट्रात अनेक सूतगिरण्या बंद अवस्थेत आहेत. प्रतिकुल परिस्थिती असतानाही विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. त्यावेळी अण्णासाहेब उढाण, विलास खरात यांचे तगडे आव्हान होते. मत्स्योदरी शिक्षण संस्था स्थापन करून गुणवत्ताधारक विद्यार्थी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून कारखाने काढले. अशा विविध विकास कामांचा ध्यास अंकुशराव यांनी घेतला होता. अंकुशराव टोपे यांनी महाराष्ट्रात अनेक संस्थांवर विविध पदांवर काम करु न त्या संस्था उत्तमरितीने चालवल्या. त्यांनी आयुष्यभर संस्थेचे हित जोपासले. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेशसह अनेक राज्यात उसाचे उत्पादन वाढल्याने महाराष्ट्रातील साखरेला उठाव नसल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा.समाधान इंगळे यांनी , तर आभार उत्तम पवार यांनी मानले.