प्राचीन स्मारक बेवारस
By Admin | Updated: August 4, 2014 01:57 IST2014-08-04T01:03:33+5:302014-08-04T01:57:17+5:30
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद या स्मारकांचा दुरुपयोग करणे किंवा हानी पोहोचविणाऱ्यास तीन महिन्यांचा कारावास व ५ हजार रुपये दंड, अशी शिक्षा आहे.

प्राचीन स्मारक बेवारस
.
मात्र, पुरातत्त्व विभागानेच स्मारकांकडे दुर्लक्ष केल्याने या बेवारस स्मारकांत अवैध धंदे सुरू झाले आहेत. तेथे ओल्या पार्ट्या होतात, पत्त्यांचे डाव रंगतात. एवढेच नव्हे तर या स्मारकांमध्ये स्वयंपाक केला जात असल्याने भिंती काळवंडल्या आहेत.
पर्यटनाची राजधानी असे बिरुद मिरविणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात पुरातत्त्व विभागाचा एवढा भोंगळ कारभार पाहून कोणीही थक्क होईल. औरंगाबादचा संस्थापक मलिक अंबरची कबर खुलताबादेत जेथे आहे त्या परिसराच्या देखभालीची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागावर आहे. मात्र, मलिक अंबरच्या कबरीबाहेरील बाजूसही अनेक प्राचीन स्मारके आहेत. या स्मारकांकडे पुरातत्त्व विभागाचे अधिकारी कधी फिरकतच नाहीत. यामुळे स्मारके बेवारस बनली आहेत. उल्लेखनीय म्हणजे ‘हे प्राचीन स्मारक १९५८ च्या २४ व्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियमान्वये राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. जर कोणी व्यक्ती या स्मारकांची नासधूस, स्थलांतर करेल, वास्तूला हानी पोहोचवेल, खराब करेल व दुरुपयोग करेल, अशा व्यक्तीला तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस पात्र राहील’, पुरातत्त्व विभाग बाहेरील बाजूस असा फलक लावून मोकळा झाला आहे. मलिक अंबरची कबर वगळता अन्य प्राचीन स्मारकांना सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले नाहीत.
मलिक अंबरच्या कबरीसमोरील दक्षिण बाजूस असलेल्या गेस्ट हाऊसची देखभाली अभावी भग्नावस्था झाली आहे. गेस्ट हाऊसची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. बाहेरील बाजूस असणारी राष्ट्रीय स्मारके बेवारस उभी आहेत. आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा येथील राष्ट्रीय स्मारकाची पाहणी केली असता तेथे सात ते आठ जण पत्ते खेळताना आढळून आले. आमच्या छायाचित्रकारांच्या हातात कॅमेरा दिसला की, सर्वांनी धूम ठोकली. याच स्मारकात एका कोपऱ्यात दोन मोठे दगड ठेवण्यात आले आहेत. तेथेच स्वयंपाक करण्यात येतो. धुरामुळे स्मारकाच्या भिंती काळवंडल्या आहेत.
या राष्ट्रीय स्मारकाच्या बाहेरील बाजूस असलेल्या सराया आता हागणदारी बनल्या आहेत. राष्ट्रीय स्मारकाची एवढी गंभीर अवस्था असेल तर पुरातत्त्व विभागाचे अधिकारी काय काम करतात, असा प्रश्न खुलताबादेतील रहिवाशांनी उपस्थित केला. राष्ट्रीय स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.