दहशतवाद विरोधी पथक, गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी नांदेडात
By Admin | Updated: August 15, 2014 00:06 IST2014-08-14T23:57:42+5:302014-08-15T00:06:29+5:30
नांदेड : तोतया नक्षलवादी संतोष आमले याला न्यायालयाने १६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़

दहशतवाद विरोधी पथक, गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी नांदेडात
नांदेड : शहरातील दोन डॉक्टरांना नक्षलवादी असल्याचे सांगून एक कोटींची खंडणी मागणाऱ्या तोतया नक्षलवादी संतोष आमले याला न्यायालयाने १६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, या घटनेचे गांभीर्य घेत दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्त वार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदेडमध्ये चौकशी सुरू केली आहे़ या प्रकाराबाबत गडचिरोली पोलिसांनाही कळविण्यात आले आहे़
नांदेडमधील डॉ़ मनिष कत्रुवार आणि डॉ़ देवेंद्र पालिवाल यांना ६ ते ८ आॅगस्टच्या दरम्यान गडचिरोलीतील माओवादी संघटनेचा कमांडर कोरकू विरंगना बोलत असल्याचे सांगून २० लाखांची मागणी केली़ पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकीही दिली़ त्यावेळी डॉक्टर युनियनचे अध्यक्ष डॉ़ पालीवाल आणि डॉ़ कत्रुवार यांनी पोलिस अधीक्षक परमजीतसिंघ दहिया यांच्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली़ त्यावेळी दहिया यांनी तपासाचे आदेश दिले़ स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार, पोलिस उपनिरीक्षक शेख रहेमान व सहकाऱ्यांनी संतोष आमले याला नांदेडमधून अटक केली़ तो मूळचा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील रहिवासी आहे़ त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी संपर्क आल्याचे सांगितले़ मात्र त्याने सांगितलेल्या गोष्टी विश्वसनीय नसल्याचे पोलिस सूत्र सांगत आहेत़ खुद्द पोलिस अधीक्षक दहिया, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांनी आमलेची चौकशी केली़
दुसरीकडे त्याने सांगितलेल्या गोष्टीबद्दल पोलिसांनी वरिष्ठांना माहिती कळविली आहे़ गडचिरोली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे़
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नांदेडमध्ये गुरूवारी दहशतवाद विरोधी पथकाच्या तसेच राज्य गुप्त वार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे़ तोतया नक्षलवाद्याने सांगितलेली कहाणी कितपत खरी आहे याचीही खबरदारी म्हणून शहानिशा करण्यात येत आहे़ स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र संतोष आमले हा तोतयाच असल्याचे स्पष्ट केले आहे़ वजिराबाद पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे उभे केले असता १६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ (प्रतिनिधी)