अॅन्टी रेबीज लसीचा तुटवडा; मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच
By Admin | Updated: September 18, 2014 00:42 IST2014-09-18T00:37:47+5:302014-09-18T00:42:24+5:30
औरंगाबाद : कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला रेबीज हा जीवघेणा आजार होण्याचा धोका असतो

अॅन्टी रेबीज लसीचा तुटवडा; मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच
औरंगाबाद : कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला रेबीज हा जीवघेणा आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे अशा रुग्णांना तातडीने अॅन्टी रेबीज सिरम (ए.आर.एस.) इंजेक्शन आणि अॅन्टी रेबीज व्हॅक्सिन (ए.आर.व्ही.) दिले जाते. मात्र, दोन महिन्यांपासून औरंगाबाद शहरात अॅन्टी रेबीज सिरमचा तुटवडा आहे. घाटीसह शहरातील खाजगी औषधालयातही अॅन्टी रेबीज सिरम उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांची चिंता वाढली आहे.
औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. कुत्रा चावल्यानंतर उपचार घेण्यासाठी घाटीत रोज सरासरी चार ते पाच रुग्ण येतात. यात बरेच रुग्ण पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे थेट घाटीत येतात. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या जखमेमध्ये रेबीजचे विषाणू असतात. रेबीजच्या विषाणूंना तातडीने नियंत्रणात न आणल्यास ते मेंदूपर्यंत जातात आणि रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका असतो. पिसाळलेल्या कुत्र्यापासून रेबीज होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा रुग्णांना तातडीने अॅन्टी रेबीज सिरम देण्यात येते. सहा महिन्यांपासून घाटीत अॅन्टी रेबीज सिरमचा तुटवडा आहे. आता तर शहरातील मेडिकल स्टोअरमध्येही अॅन्टी रेबीज सिरम मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची चिंता वाढली आहे. रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन वेळेवर घेणेही आवश्यक असते. सूत्रांनी सांगितले की, अॅन्टी रेबीज सिरमची मागणी सर्व शहरात असते. मात्र, त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. परिणामी शहरातही रेबीज प्रतिबंधक इंजेक्शनचा तुटवडा आहे. शिवाय ते महागडे असल्याने सर्वच मेडिकलचालक ठेवत नाहीत.