ुविरोधी पक्ष नेत्यांनी पाहिली दुष्काळाची दाहकता
By Admin | Updated: May 20, 2015 00:20 IST2015-05-19T23:58:31+5:302015-05-20T00:20:31+5:30
बीड: महाराष्ट्र राज्य विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी जिल्ह्यात दाखल होऊन दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियाची भेट घेऊन सांत्वन केले

ुविरोधी पक्ष नेत्यांनी पाहिली दुष्काळाची दाहकता
बीड: महाराष्ट्र राज्य विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी जिल्ह्यात दाखल होऊन दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच बीड तालुक्यातील मांडवखेल येथील रोपवन व वृक्षलागवडीच्या रोजगार हमी योजनेच्या कामास भेट दिली. दुष्काळाचे काय परिणाम आहेत, याची जाणीव विरोध पक्ष नेत्यांना या दुष्काळी दौऱ्यातून आले.
विरोध पक्ष नेते विखे पाटील पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या सोबत माजी मंत्री अशोक पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. सर्जेराव काळे, तालुकाध्यक्ष नवनाथ थोटे, अशोक हिंगे, अॅड. राहुल साळवे होते.
केजचा दौरा उरकला पंधरा मिनिटांत
केज तालुक्यातील नांदुर घाट येथील शेतकरी अरुण विश्वनाथ जाधव यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केली होती. जाधव यांच्या कुटूंबियास विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भेट दिली.
जाधव कुटूंबियांचे विरोध पक्ष नेत्यांनी सांत्वन केले व निघुन गेले. मोठा गाजावाजा करुन विरोधी पक्ष नेते गावात दाखल झाले होते. जाधव कुटूंबियांसाठी विरोधी पक्ष नेते आर्थीक मदतिची घोषणा करतील अशी नांदुरघाट ग्रामस्थांची आपेक्षा होती मात्र त्यांनी पंधरा मिनिटाच दौरा उरकून पुढे निघाले.
एकनाथ शिंदे यांनी दिली होती मदत
तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरातील पालसिंगण, नारेवाडी, हंगेवाडी येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांसाठी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र अरुण जाधव यांच्या कुटूंबियांना विरोधी पक्ष नेत्यांनी भेट देली मात्र आर्थिक मदतीची घोषणा केली नाही.
कुर्ला येथे दिली भेट
बीड तालुक्यातील कुर्ला येथील आत्महत्याग्रस शेतकरी लक्ष्मण आश्रुबा गुंड यांच्या कुटूंबियास त्यांनी भेट दिली. त्यांचे सात्वंन करुन ते बीडकडे रवाना झाले. दरम्यान बीड तालुक्यातील म्हाळस जवळा येथील टँकरग्रस्त गावास भेट काही कारणामुळे रद्द करण्यात आली.
महाराष्ट्र नव्हे, मेकिंग गुजरात होत आहे- विखे पाटील
बीड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या मेकींग इंडियाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मेकींग महाराष्ट्र जाहीर केले, मात्र महाराष्ट्रातील गुजरात येथे जात असल्याने मेकींग गुजरात होत आहे. हे थांबविण्याची ताकद मुख्यमंत्र्यात आहे का ?, असा सवाल विधान सभेचे विरोध पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
बीड तालुक्यातील पाली येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबियास भेट दिल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना, विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रील उद्योग बाहेर राज्यात जात आहे. कंपन्यांना सवलत देण्यावर विचार केला जात नाही. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत हे थांबविण्याची ताकद मुख्यमंत्र्यांमध्ये आहे का ?, असा सवाल विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला.
विखे पाटलांनी घेतली बैठक
बीड शहरातील महिला महाविद्यालयातील मिटींग हॉल येथे विरोधीपक्ष नेते विखेपाटील यांच्या उपस्थिती काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकी दरम्यान त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. नागरिकांच्या कामांना प्राधान्य द्यावे. हे सरकार सर्वसामान्यांचे नाही. त्यामुळे त्यांनी जनतेच्या तक्रारींची दखल घ्यावी. ज्या तरूणांनी भाजप सरकारला निवडून दिले आहे. तेच तरूण आता हे सरकार गाडतील, असे ते म्हणाले.
बीड तालुक्यातील कुर्ला येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्या शेतकऱ्याकडून बँकेने ११.३० टक्कयांनी व्याज घेतले. परंतु पीक कर्ज ६ टक्क्यांनी द्यावे, असा नियम आहे. हा डावलण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता शेतकऱ्यांकडून अधिक कर्ज वसूल करणाऱ्या तीन राष्ट्रीयकृत बँकाविरूद्ध गुन्हे दाखल करणार असल्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद प्रसंगी सांगितले.
५० टक्क्यांपेक्षा आणेवारी कमी असलेल्या गावांना पीक कर्ज माफ करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बळीराजा संकटात आलेला असताना एकही लोकप्रतिनिधी याची गंभीर दखल घेत नाही.एकाही लोकप्रतिनिधीने त्यांच्या मतदारसंघात जाऊन मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शेतकरी आत्महत्येबद्दल सरकारला फारसे गांभीर्य नाही. दुष्काळी दौऱ्या दरम्यान मांजरसुंबा येथे टँकरद्वारे मिळणारे पाणी अत्यंत निकृष्ट आहे. टँकरचे पाणी विहिरीत टाकून त्याचे शुद्धीकरण करून ते दिले पाहिजे. परंतु अशी काळजी घेतली जात नाही. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा हा उत्तम नमुना असल्याचे ते म्हणाले. रबीची पिके घेतलेल्या गावांना खरिपाचे अनुदान मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे. मग शेतकऱ्यांनी खरीपाची पिके घेऊच नयेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याचेही विखे म्हणाले. पंतप्रधान मोदी हे परदेश वाऱ्या करीत आहेत. त्या पाठोपाठ आता मुख्यमंत्रीही परदेशी वाऱ्या करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हीडिओ कॉन्फरन्सींगवरून दुष्काळी आढावा घेतात. व्ही.सी.वरून ते दुष्काळ पाहतात, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्तेवर आल्यानंतर भाजपा नेते सर्व आश्वासन विसरून गेले. भाजपा मंत्र्यांना वेळ नसल्याची टीकाही त्यांनी केली.
बीड: शेतकरी आत्महत्या करीत आहेत, याचे गांर्भीय बहुदा राष्ट्रीयकृत बँकाना नाही. शेतकऱ्यास शासनाकडून मदत मिळाल्यास तात्काळ त्यातून कर्जाची रक्कम कपात करुन उर्वरित रक्कम कुटूंबियांच्या हाती देत असल्याचा धक्कादायक प्रकार विरोध पक्ष नेत्यांनी केलेल्या दुष्काळी दौऱ्या प्रसंगी समोर आला.
शेतकऱ्यांप्रती असलेली असंवेदनशीलता बँका यातून दाखवित असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. बीड तालुक्यातील पाली येथील शेतकरी बापु दामु नवले यांनी चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. नापिकी व बँककडेकडून कर्ज घेतले होते. ते फेडणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. विरोध पक्ष नेते विखे पाटील पाली येथे मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत माजी मंत्री अशोक पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. सर्जेराव काळे, तालुकाध्यक्ष नवनाथ थोटे, अॅड. साळवे हे उपस्थित होते. विखे पाटील यांनी मयत शेतकरी बापु नवले यांची पत्नी, दोन मुले यांच्या चर्चा केली. एक मुलगा कापड दुकानावर कामाला आहे तर दुसरा नववीच्या वर्गात शिकतो आहे. आयटीआय करण्याचा सल्ला त्यांनी त्यास दिली. ‘तुमच्या पतीने आत्महत्या केली, शासनाकडून काही मदत मिळाली का ?, हा प्रश्न विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी बापु नवले यांची पत्नी यास विचारला असता त्या म्हणाल्या, हो, तीस हजार रुपये खात्यावर जमा झाले होते. पण बँकेने ‘ह्यांनी’ घेतलेले १५ हजार रुपये कर्ज कापून घेतले असल्याचे सांगितले. हे ऐकून माजी मंत्री विखे पाटील यांनी पैसे कपातीचे अल्प शब्दात विश्लेषण केले. विखे पाटील यांनी येथेही कोणतीच घोषणा न करता निघून गेले. विरोध पक्ष नेते नवले कुटूंबियासाठी काही आर्थिक तरतुदीची घोषणा करतील, अशी आशा ग्रामस्थांना होती, मात्र ती फोल ठरली.