...अन् रावसाहेब दानवे यांनी काढला पत्रकार परिषदेतून पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:25+5:302020-12-17T04:31:25+5:30

सध्या देशभर कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन गाजत आहे. या आंदोलनाचा तिढा सुटता सुटत नाही, असे चित्र निर्माण झाले ...

... Anravasaheb Danve escaped from the press conference | ...अन् रावसाहेब दानवे यांनी काढला पत्रकार परिषदेतून पळ

...अन् रावसाहेब दानवे यांनी काढला पत्रकार परिषदेतून पळ

सध्या देशभर कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन गाजत आहे. या आंदोलनाचा तिढा सुटता सुटत नाही, असे चित्र निर्माण झाले असून उलट हे आंदोलन वाढतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर पत्रकार परिषदा घेऊन संमत केलेले कृषी कायदे काय आहेत, शेतकऱ्यांना त्याचे फायदे मिळणार आहेत यासंदर्भात जनजागृती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी ३ वाजता रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये आयोजित केली होती. पत्रकार परिषदेला यायलाच दानवे यांना उशीर झाला.

आल्या आल्या त्यांनी आपले मुद्दे मांडायला सुरुवात केली. स्वामीनाथन आयोगाच्या जास्तीत जास्त शिफारशी या कायद्याद्वारे अमलात येणार असून २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांच्या निवेदनानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. एकेका प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी प्रत्येक पत्रकाराचा प्रश्न एकानंतर एक ऐकून घेतला. त्यावर त्यांनी छोटेखानी निवेदन केले.

मी हाडाचा शेतकरी आहे. बनावट किंवा कागदी शेतकरी नाही. मी गाई-म्हशींचे दूध काढतो, बैलांना अंघोळ घालतो हे सारे इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखविले आहे. मग तुम्ही सांगा एक शेतकरी शेतकऱ्याची विटंबना करू शकेल काय? माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्यानंतर मग मी काय बोलू ? असा सवाल उपस्थित करून रावसाहेब दानवे जागेवरून उठले, पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले.

विपर्यास केला म्हणजे काय, मग आपण नेमके काय बोलला होता ते तरी सांगा असे पत्रकार म्हणून लागले. परंतु रावसाहेब दानवे कोणाचेच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, शहराध्यक्ष संजय केणेकर, ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस बापू घडामोडे त्यांच्या बाजूला बसले होते. पदाधिका-यांच्या व पत्रकारांच्या गर्दीतून वाट काढत दानवे निघून गेले. किसान मोर्चाचे मदन नवपुते, प्रमोद राठोड, ॲड. बद्रीनारायण भुमरे, महिला पदाधिकारी माधुरी अदवंत, मनीषा भन्साळी, राजगौरव वानखेडे, सविता कुलकर्णी, मंगलमूर्ती, डॉ. राम बुधवंत आदी पदाधिकारी दानवे निघून गेल्यानंतर पत्रकार स्थळी थांबलेले होते.

Web Title: ... Anravasaheb Danve escaped from the press conference