आणखी एका लाल दिव्याचे वेध!

By Admin | Updated: July 24, 2016 00:41 IST2016-07-24T00:32:43+5:302016-07-24T00:41:52+5:30

जालना : गेल्या वर्षभरापासून महामंडळांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत. महत्त्वाचे महामंडळ आपल्याकडेच रहावे, यासाठी शिवसेना व भाजपामध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे

Another red light perforation! | आणखी एका लाल दिव्याचे वेध!

आणखी एका लाल दिव्याचे वेध!


जालना : गेल्या वर्षभरापासून महामंडळांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत. महत्त्वाचे महामंडळ आपल्याकडेच रहावे, यासाठी शिवसेना व भाजपामध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. आगामी पंधरा दिवसांत या नियुक्त्या जाहीर होण्याची चिन्हे आहेत. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्यात याचीच चर्चा झाली आणि आणखी एक लालदिवा महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळण्याचे वेध लागले आहेत.
राज्य मंत्रिमंडळात अर्जुन खोतकर यांचा समावेश झाल्याने त्यांचा शनिवारी सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खा. दानवे यांनी आपला राजकीय प्रवास मांडतानाच केलेल्या कोट्या आणि मारलेल्या राजकीय कोपरखळ्यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या राजकीय भावनांना वाट मोकळी करुन दिली. शिवसेना सहसंपर्क प्रमुख शिवाजी चोथे यांनी सर्वांनाच संधी मिळत नसल्याचे सांगून आपणही अजून प्रतीक्षेत असल्याचे कबूल केले. तर बहुप्रतिक्षित असलेल्या महामंडळांवरील नियुक्त्यांवरुन खा. दानवे, आ. राजेश टोपे, राज्यमंत्री खोतकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना झुकते माप देण्याचा आग्रह केला. तर महामंडळाच्या निमित्ताने अंबेकर यांना भडकावून आमच्यात भांडणं लावू नका, असा इशारा खा. दानवे यांनी आ. टोपेंना दिला. तर रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष ब्रम्हानंद चव्हाण यांनी रिपाइं ज्या पक्षासोबत असते तो पक्ष सत्तेत असतो, असे सांगत आघाडी सरकारच्या काळात कमिट्यांवर आपल्याला नियुक्ती मिळाली होती. मात्र, युती सरकारमध्ये अद्याप महामंडळांची यादी जाहीर झाली नाही. आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन आपणही प्रतीक्षेत असल्याचे सांगून
टाकले.
एकूणच सत्कार सोहळ्यात महामंडळावरील नियुक्त्यांचा विषय सर्वच नेत्यांनी लावून धरत अंबेकर यांच्यासाठी जोरदार बॅटींग केली. खा. दानवे यांनीही जिल्ह्याला आणखी लाल दिवा मिळायला हवा, असे सांगून यात रंग भरला आणि ते प्रदेशाध्यक्ष असल्याने सरकारवर त्यांचा प्रभाव आहे. म्हणूनच भविष्यात महामंडळाच्या रुपाने जिल्ह्याला आणखी एक लाल दिवा मिळण्याचे वेध लागले आहेत.
राज्यमंत्री खोतकर यांनीही मंत्री पद मिळण्यापूर्वीच अंबेकर यांना महामंडळ देण्यात यावे, यासाठी पक्षश्रेष्ठीकडे आग्रह धरल्याचे सांगून आपणही जीवलग मित्रासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
भास्कर अंबेकर यांना गुलाब आणि खा. रावसाहेब दानवे यांना झेंडुच्या फुलाची उपमा देऊन दोन्ही फुलांचे महत्त्व खोतकर यांनी अधोरेखित केले. गुलाब सर्वव्यापी, तर झेंडूची पूजा ही दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत केली जाते. म्हणून यालाही महत्त्व असल्याचे सांगत खा. दानवे यांचे राज्याच्या राजकारणात वाढलेले महत्त्व जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे खोतकर म्हणाले.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आपल्याकडे असल्याने संपूर्ण राज्यात लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील आमचा खेळ पांगलेला आहे. आता तुम्हीच माझेपण पहा, असे सांगत खा. दानवे यांनी खोतकर यांना जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची एकप्रकारे सूचना केल्याने आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्व वाढणार असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.

Web Title: Another red light perforation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.