भोंदूबाबाचा आणखी एक एजंट गजाआड
By Admin | Updated: November 27, 2014 01:09 IST2014-11-27T00:51:37+5:302014-11-27T01:09:47+5:30
औरंगाबाद : जादूने पैशांचा पाऊस पाडून पैसे चौपट करून देण्याचे आमिष दाखवीत राज्यभरातील अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या

भोंदूबाबाचा आणखी एक एजंट गजाआड
औरंगाबाद : जादूने पैशांचा पाऊस पाडून पैसे चौपट करून देण्याचे आमिष दाखवीत राज्यभरातील अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या साहेब खान ऊर्फ सत्तारबाबा यासीन खान (रा. नारेगाव) याच्या आणखी एका एजंटाला गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली.
सिद्दीकी ऊर्फ अश्पाक मुस्तफा सिद्दीकी (३४, रा. साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, बुलडाणा), असे या एजंटाचे नाव आहे. गंडविण्यासाठी सावज शोधून आणणे आणि त्या मोबदल्यात कमिशन घेणे, असे काम सिद्दकी करीत असल्याचे तपासात स्पष्ट झालेले आहे.
कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, सत्तारबाबा व त्याच्या टोळीने आठ लाख रुपयांना गंडविल्याप्रकरणी अकोला येथील दीपक दुर्गादास दुबे यांनी सिडको एमआयडीसी ठाण्यात फिर्याद दिली होती. दुबे व त्यांच्या मित्रांची भेट आरोपी सिद्दीकीने घालून दिलेली होती. बाबा व त्याच्या टोळीने दुबे व त्यांच्या मित्रांना गंडा घातला. नंतर या कामातील कमिशनपोटी सिद्दीकीला बाबाने सव्वा लाख रुपये दिले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून सिद्दीकी फरार होता. तो काल गावात आल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. लगेच पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, सहायक फौजदार शेख आरेफ, सुधाकर राठोड, फकीरचंद फडे, भीमराव पवार, नंदलाल चव्हाण यांनी साखरखेर्डा गावी जाऊन सिद्दीकीला अटक केली.