आणखी एक बुकी पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: June 2, 2015 00:25 IST2015-06-02T00:25:43+5:302015-06-02T00:25:43+5:30
औरंगाबाद : आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आॅनलाईन सट्टा खेळविणाऱ्या टोळीतील आणखी एका बुकीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी अटक केली.

आणखी एक बुकी पोलिसांच्या जाळ्यात
औरंगाबाद : आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आॅनलाईन सट्टा खेळविणाऱ्या टोळीतील आणखी एका बुकीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी अटक केली.
धीरज उर्फ पवन वर्मा (रा. भवानीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आॅनलाईन सट्टा खेळविणाऱ्या सट्टेबाजांचा गत महिन्यात पर्दाफाश केला होता. उस्मानपुरा भागात स्वत:च्या घरात मिनी टेलिफोन एक्स्चेंज उभारून बुकींना लाईन देणाऱ्या नरेश पोतलवाड याच्यासह सहा जणांना कारवाईच्या दिवशी अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी धाड मारली त्याप्रसंगी २८ बुक ी आॅनलाईन सट्टा खेळवीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केलेली आहे. यात दिल्लीतील दोन बुकींचा समावेश आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी धीरज वर्मा हा उच्च शिक्षित आहे. पोलिसांनी धाड मारली त्या दिवशी तो नरेश पोतलवाडच्या मिनी टेलिफोन लाईन एक्स्चेंजशी कनेक्ट होता. मात्र, तो गावाबाहेर असल्याने पोलिसांना मिळाला नव्हता. दरम्यान, पोलिसांनी धाड मारल्याचे कळताच तो फरार झाला होता. दरम्यान, तो शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यास रविवारी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास ५ जूनपर्यंत कोठडी मिळाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आॅन लाईन सट्टा खेळविणारे फरार बुकींचा पोलीस शोध घेत आहेत. यापैकी काही बुकींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.