‘एमसीआय’च्या धास्तीने वाढल्या आणखी १५० खाटा
By Admin | Updated: May 22, 2017 00:04 IST2017-05-22T00:02:05+5:302017-05-22T00:04:40+5:30
लातूर : एमसीआयच्या तपासणीच्या धास्तीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे.

‘एमसीआय’च्या धास्तीने वाढल्या आणखी १५० खाटा
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : एमसीआयच्या तपासणीच्या धास्तीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे. तपासणी दरम्यान कुठल्याही त्रुटी निघू नयेत म्हणून प्रशासनाने आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली आहे. त्यामुळे सर्वोपचारमध्ये आणखीन १५० खाटा वाढल्या आहेत. आता खाटांची संख्या ७७० अशी झाली आहे. खाटा वाढल्यामुळे रुग्णांना आणखीन सुविधा मिळणार आहेत.
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात चांगल्या व दर्जेदार सुविधा मिळतात म्हणून जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. त्यामुळे सकाळच्या वेळी रुग्णालय परिसरात जणू रुग्णांचा मेळाच जमल्याचे पहावयास मिळते. सर्वोपचारमध्ये दररोज १२०० पेक्षा जास्त रुग्ण तपासणीसाठी नोंदणी करतात.
सर्वोपचारमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता तपासणी कक्षाची इमारत वगळता अन्य तीन इमारती आहेत. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय सन २००२ मध्ये १०० खाटांचे होते. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत असल्याने साडेचार वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरूही झाली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे ६२० खाटांचे होते. परंतु, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार खाटांची संख्या कमी होती. दरम्यान, गत काही दिवसांपूर्वी या रुग्णालयाचे परिक्षण नवी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया) होणार असल्याचे निश्चित झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने या परिक्षणात कुठल्याही त्रुटी निघू नयेत, याची दक्षता घेतली. त्यामुळे रुग्णालयातील काही वॉर्डांची फेररचना केली. त्याचबरोबर खाटांच्या संख्येत वाढ केली. खाटांची ही वाढ दीडशे अशी असून, आता ७७० अशी खाटांची संख्या झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची आता होणारी थोडीफार गैरसोयही दूर होणार आहे.