तिकीट मशीनचा वाहकांना वैताग,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:02 AM2021-03-01T04:02:02+5:302021-03-01T04:02:02+5:30

अपहाराच्या कारवाईचे संकट : मशीन हँग होणे, तिकिटाची प्रिंटच न येणे, चार्जिंग संपण्याचा मनस्ताप औरंगाबाद : एसटी बसस्थानकातून बाहेर ...

Annoyance to ticket machine carriers, | तिकीट मशीनचा वाहकांना वैताग,

तिकीट मशीनचा वाहकांना वैताग,

googlenewsNext

अपहाराच्या कारवाईचे संकट : मशीन हँग होणे, तिकिटाची प्रिंटच न येणे, चार्जिंग संपण्याचा मनस्ताप

औरंगाबाद : एसटी बसस्थानकातून बाहेर घेऊन जात नाही तोच तिकीट मशीन हँग होणे, तिकिटाची प्रिंटच न येणे, चार्जिंग संपणे, अशा प्रकारांना वाहकांना तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्यात बसची तपासणी झाली, तर वाहकाला थेट अपहाराच्या कारवाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे तिकीट मशीनच्या अवस्थेविषयी वाहकांतून संताप व्यक्त होत आहे.

खराब तिकीट मशीनमुळे झालेल्या तांत्रिक चुकांचा दोष टाकल्याचे म्हणत चार पानी पत्र लिहून एका वाहकाने एसटी बसमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील माहूर आगारात घडली. एसटीमध्ये ईटीआय मशीनद्वारे तिकीट देण्यात येते. अनेक वेळा या मशीनबाबत संबंधित वाहकांकडून तक्रारी करण्यात येत असतात. कधी कधी प्रिंट न निघणे, मशीन हँग होणे यासह अन्य तक्रारीही समोर आलेल्या आहेत; पण हा प्रकार काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. यामुळे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता थेट तिकीट अपहाराची कारवाई केली जात असल्याचे वाहकांचे म्हणणे आहे.

मशीन बिघडणे झाले रोजचेच

औरंगाबाद विभागात १ हजार १८७ ईटीआय मशीन आहेत. राेजच मशीन बिघडण्याच्या समस्येला वाहकांना ताेंड द्यावे लागत आहे. चार्जिंग लवकर संपणे, मशीनमधून तिकीट बाहेर न येणे या गाेष्टींना वाहकांना ताेंड द्यावे लागते.

----

महिनाभरात ३६० तक्रारी

१) गेल्या महिनाभरात ३६० तिकीट मशीन नादुरुस्त झाल्याचे समाेर आले, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अमाेल अहिरे यांनी दिली.

२) महिनाभराची ही संख्या पाहता वर्षभरात किमान ३ हजार तिकीट मशीन खराब हाेण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यातून वाहकांना नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आढवते.

३) तिकीट मशीन खराब हाेणे आणि दुरुस्त करणे, ही राेजचीच प्रक्रिया आहे, असे म्हणून एसटी महामंडळाचे अधिकारी माेकळे हाेत आहेत.

--------

वाहक म्हणतात...

मशीन खराब हाेण्याच्या समस्येमुळे हिशाेब जुळत नाही. त्यातूनच कारवाईला सामाेरे जावे लागते. मशीन हँग हाेणे, तिकीट बाहेर न येणे, चार्जिंग संपणे हे राेजचेच झाले आहे.

-एक वाहक

जुन्या वाहकांना म्हणजे ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना मशीनमध्ये बिघाड झाल्यास कागदी तिकीट देणे साेपे जाते; परंतु नव्या वाहकांना तिकीट ट्रे वापरण्याचा अनुभवच नाही. त्यासंदर्भात पुरेसे प्रशिक्षण दिले पाहिजे.

-दुसरा वाहक

------

नवीन मशीन मिळण्याची गरज

तिकीट मशीनच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे नवीन मशीन दिले पाहिजे. कर्तव्य संपण्याआधीच मशीनची चार्जिंग संपते. तिकीट उशिरा निघतात. त्यावेळी अचानक बसची तपासणी झाली, तर कारवाईची शक्यता वाढते. तिकीट मशीनच्या प्रश्नासंदर्भात वारंवार मागणी करण्यात आलेली आहे.

-राजेंद्र माेटे, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना

--------

तिकीट ट्रे वापरण्याची सुविधा

तिकीट मशीन जर खराब झाले, तर तिकीट ट्रे वापरता येताे. प्रत्येक वाहकाकडे तिकीट ट्रे असताे. तिकीट मशीन घेतानाच वाहकांना तपासून घेता येते.

-अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

---

जिल्ह्यातील आगारांची संख्या- ८

एकूण एसटी बस संख्या- ५५०

वाहकांची संख्या- ९३१

Web Title: Annoyance to ticket machine carriers,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.