भक्तिगीतात रंगला वर्धापन दिन
By Admin | Updated: April 18, 2016 01:28 IST2016-04-18T01:28:16+5:302016-04-18T01:28:54+5:30
औरंगाबाद : ब्राह्मण महिला मंचच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच बलवंत वाचनालय येथे कार्यक्रम घेण्यात आला.

भक्तिगीतात रंगला वर्धापन दिन
औरंगाबाद : ब्राह्मण महिला मंचच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच बलवंत वाचनालय येथे कार्यक्रम घेण्यात आला. भजन स्पर्धेचे आयोजन करून या कार्यक्रमाची गोडी आणखी वाढविण्यात आली. याप्रसंगी डॉ. स्वाती शिरडकर, अॅड. स्मिता नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित महिलांशी संवाद साधताना डॉ. शिरडकर यांनी सृदृढ शरीरासोबतच सुदृढ मन असणे किती महत्त्वाचे असते, ते समजावून सांगितले. सकारात्मक पद्धतीने कार्य करण्यासाठी मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यासाठी आवश्यक असणारे उपायदेखील त्यांनी सोप्या शब्दांत सांगितले. अॅड. नगरकर यांनी कायदेविषयक माहिती दिली. यावेळी चैत्रगौरीच्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ महिलांना ‘मी स्वामिनी, मी रणरागिणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये नलिनी पिंपळे, वंदना कुलकर्णी, नीता हेलसकर, जया सांपदे, शीतल सराफ, अनुराधा देशपांडे, जया न्यायाधीश, सुरेखा बक्षी, सुरेखा दीक्षित, लोंढे, विजया पाटील, वंदना देशमुख, अर्चना झाल्टे या महिलांचा गौरव करण्यात आला. भक्तिगीत स्पर्धेत माधुरी लासूरकर यांना प्रथम पुरस्कार मिळाला, तर हर्षदा धारवाडकर, ऐश्वर्या जोशी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकावला. वैशाली काळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच आरंभ बचत गटाने सादर केलेल्या ‘बेटी बचाओ’ या नाटिकेने उपस्थितांना सामाजिक संदेश दिला.