अणदूरचे तलाठी जेरबंद
By Admin | Updated: December 8, 2015 00:04 IST2015-12-07T23:21:05+5:302015-12-08T00:04:37+5:30
उस्मानाबाद : शेतजमिनीचा फेरफार मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर करून तसा सातबारा देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती

अणदूरचे तलाठी जेरबंद
उस्मानाबाद : शेतजमिनीचा फेरफार मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर करून तसा सातबारा देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती दोन हजार रूपये घेणाऱ्या अणदूर (ता़तुळजापूर) सज्जाचे तलाठी धन्वंतर नागनाथ गायकवाड यांना एसीबीने जेरबंद केले़ ही कारवाई सोमवारी सायंकाळी तुळजापूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आली़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या नातेवाईकांच्या सातबाऱ्यावर त्यांच्या मुलांची नावे घेऊन तसा सातबारा देण्यासाठी अणदूर सज्जाचे तलाठी धन्वंतर नागनाथ गायकवाड यांची भेट घेवून कागदपत्रे दिली़ त्यावेळी गायकवाड यांनी तसा सातबारा देण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी केली़ तडजोडीअंती सहा हजार रूपयांची मागणी करून पैसे दिल्याशिवाय फेरफार मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर करवून घेऊन तसा सातबारा फेरफार देणार नाही, असे सांगितले़ त्यामुळे तक्रारदाराने जवळील तीन हजार रूपये तलाठी गायकवाड यांना दिले़ तेव्हा गायकवाड यांनी उर्वरित तीन हजार रूपये आणून देण्याबाबत तक्रारदाराकडे तगादा लावला़ त्यानंतर तक्रारदाराने उस्मानाबाद येथील एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली़
दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अपर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात सोमवारी सायंकाळी सापळा रचला़ तक्रारदाराच्या कामासाठी ३ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २ हजार रूपये घेतल्यानंतर तलाठी गायकवाड यांना जेरबंद करण्यात आले़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ (प्रतिनिधी)