संतप्त प्रवाशांची रेल्वेवर दगडफेक

By Admin | Updated: May 8, 2017 23:38 IST2017-05-08T23:36:03+5:302017-05-08T23:38:37+5:30

उस्मानाबाद : बिदर- मुंबई रेल्वेत बसण्यासाठी जागा न मिळाल्याने संतापलेल्या काही प्रवाशांनी रेल्वेवर दगडफेक केली़

Angry passengers pelted stones on the railway | संतप्त प्रवाशांची रेल्वेवर दगडफेक

संतप्त प्रवाशांची रेल्वेवर दगडफेक

लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : बिदर- मुंबई रेल्वेत बसण्यासाठी जागा न मिळाल्याने संतापलेल्या काही प्रवाशांनी रेल्वेवर दगडफेक केली़ यात रेल्वे डब्याची काच फुटून दगड लागल्याने महिला प्रवासी जखमी झाली़ ही घटना रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर घडली़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर- मुंबई ही रेल्वे बिदर येथून सुरू करण्यात आली आहे़ या निर्णयाविरोधात उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यातील विविध संघटनांनी आंदोलन केले होते़ सोलापूर येथे संघटना पदाधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर रेल्वे रोको आंदोलन स्थगित करण्यात आले़ बिदर येथून रेल्वे सुटू लागल्यापासून उस्मानाबाद व पुढील रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत जाताही येत नाही़ अनेकवेळा दरवाजे आतूनच लॉक करून घेण्यात येत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ११़५५ वाजता येणाऱ्या बिदर- मुंबई रेल्वेतून प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी स्थानकावर आले होते़ रेल्वे आल्यानंतर आरक्षण घेतलेल्या प्रवाशांना रेल्वेत जाणे मुश्किल झाले होते़ तर जनरल डब्यांना आतूनच लॉक लावून घेतल्याने संताप व्यक्त होत होत़ प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केल्यानंतर रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून काही प्रवाशांना रेल्वेत बसविले़ त्यानंतरही अनेक प्रवासी बाहेर राहिले होते़ रेल्वे सुरू झाल्यानंतर पुन्हा प्रवाशांनी गोंधळ सुरू केला़ त्यावेळी तेथे उपस्थित रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुन्हा काही मिनिट रेल्वे थांबवून प्रवाशांना आत सोडले़ मात्र, तरीही काही प्रवासी रेल्वेच्या बाहेरच राहिले़ रेल्वेत बसण्यासाठी जागा न मिळालेल्या संतप्त काही प्रवाशांनी थेट रेल्वेवर दगडफेक केली़ एक दगड रेल्वेच्या खिडकीच्या काचेला लागून आत गेला़ खिडकीत बसलेल्या एका महिलेला हा दगड लागल्याने त्या जखमी झाल्या़ त्यांना पुढे बार्शी येथे उपचारासाठी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, याबाबत कुर्डूवाडी येथील रेल्वे पोलिसांकडे विचारणा केल्यानंतर या प्रकाराची कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले़

Web Title: Angry passengers pelted stones on the railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.