नागद : कन्नड तालुक्यातील नागद गावातील २५ वर्षीय तरुणाची मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डीपीजवळ ही घटना घडली. हत्येच्या घटनेने नागद पंचक्रोशीत खळबळ उडाली.
शुभम रणवीरसिंह राजपूत (वय २५, रा. नागद) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आहे. दोघे घटनेनंतर फरार झाले आहेत. अमोल दशरथ निकम, सचिन दशरथ निकम, शंकर दशरथ निकम, ऋषी गोविंद निकम आणि अविनाश गोविंद निकम, बंडू शिवसिंह राजपूत, सतीश संतोष राजपूत अशी आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी अमोल हा रात्री अपरात्री गल्लीत राहण्यास आलेल्या एका व्यक्तीकडे येत होता. त्यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याचे म्हणत शुभमने त्याला हटकले होते. त्याचाच राग मनात धरून अमोलने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मंगळवारी रात्री शुभमच्या मानेवर व शरीरावर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामचंद्र पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. बुधवारी सकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले होते.
संतप्त युवकांकडून रास्ता रोको,बंदोबस्ताने गावाला छावणीचे स्वरूपशुभमच्या हत्येनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवून एसआरपी, महिला पोलिस आणि दंगाकाबू पथक तैनात केले. यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी गावातील संतप्त युवकांनी रास्तारोको आंदोलन केले. ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. युवकांनी पोलिस चौकीत निवेदन सादर करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.