अंगणवाडी सेविका,मदतनिसांचा मोर्चा
By Admin | Updated: February 1, 2015 00:48 IST2015-02-01T00:48:32+5:302015-02-01T00:48:32+5:30
लातूर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी शनिवारी प्रदेश अध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या उपस्थितीत

अंगणवाडी सेविका,मदतनिसांचा मोर्चा
लातूर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी शनिवारी प्रदेश अध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या उपस्थितीत टाऊन हॉल मैदान ते जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला़
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने आयएसओ दर्जाच्या अंगणवाड्यासाठीची सक्ती बंद करावी़ दर महिन्याच्या १० तारखेला मानधन द्यावे़ मानधन वाढीतील फरकाची थकबाकी देऊन सुधारीत दरानुसार मानधन द्यावे, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनिसांना पेन्शन लागू करावे, मयत अंगणवाडी सेविका व मदतनिसाच्या वारसांना पेन्शन अंतर्गत विम्याचा लाभ मिळवून द्यावा, वर्षभरातील प्रलंबित प्रवास व विंधन देयके दर तीन महिन्यांनी अदा करावीत़ एसएससी उत्तीर्ण झालेल्या अंगणवाडी कार्यकर्तींच्या मानधनात ५० रुपयांची वाढ करण्यात यावी, अंगणवाडी कार्यकर्तींनी ५ वर्ष किंवा १० वर्ष सेवा पूर्ण केल्यास त्यांच्या मानधनात ३१ व ६३ रुपयाने वाढ होते, ती थकीत मानधनवाढ देण्यात यावी़ विविध कार्यक्रमानिमित्त होणारा फोटो, अल्पोपहार व सत्कार आदीसाठी बजट उपलब्ध करुन द्यावे, दरवर्षी दिवाळीला अंगणवाडी, सेविका व मदतनीस यांना १ हजार रुपयाची भाऊबीज भेट देण्यात यावी़
अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांना देण्यात येणारी खातेबाह्य कामे देऊ नयेत़ अंगणवाडी व कार्यकर्तींच्या समस्या सोडविण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठका घ्याव्यात, अंगणवाडी भरविण्याच्या वेळेत समानता यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे़ या मागण्यांसाठी शहरातील टाऊन हॉल मैदानाहून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांना निवेदन देण्यात आले़ या निवेदनाच्या प्रती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहेत़ या मोर्चाला जिल्ह्यातील दीड हजार अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)