अन् नानांनी दिली कर्तव्याची आठवण...

By Admin | Updated: November 28, 2014 01:16 IST2014-11-28T00:59:27+5:302014-11-28T01:16:42+5:30

औरंगाबाद : ‘मराठवाडा शिक्षण हक्क व कर्तव्य परिषदेत’ राज्य शिक्षण संस्था महामंडळांच्या नेत्यांनी हक्काचा पाढा वाचला, तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी

And they remember the duty of the NAN | अन् नानांनी दिली कर्तव्याची आठवण...

अन् नानांनी दिली कर्तव्याची आठवण...


औरंगाबाद : ‘मराठवाडा शिक्षण हक्क व कर्तव्य परिषदेत’ राज्य शिक्षण संस्था महामंडळांच्या नेत्यांनी हक्काचा पाढा वाचला, तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी उपस्थित संस्थाचालक व शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली. येथील रुख्मिणी सभागृहात गुरुवारी आयोजित शिक्षण परिषदेचे ‘हक्क व कर्तव्य’ अशा पद्धतीने पार पडले.
गावातील शाळा सोडून पालक त्यांच्या पाल्यांना गाडी करून १५ ते २० किलोमीटर दूरच्या शाळेत का पाठवीत आहेत, त्यातून शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होऊन शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. विद्यार्थी संख्या कमी होण्याला समाज व सरकार जबाबदार आहे का? असा थेट प्रश्न हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला. तेव्हा उपस्थित शिक्षकांना टाळ्या वाजवून प्रतिसाद देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. याचे उत्तर आपणास माहिती आहे, असे सांगून बागडे म्हणाले की, याला जबाबदार तुम्हीच (शिक्षक- संस्थाचालक) आहात. पहिल्या वर्गापासून मुले तुमच्याकडे शिकतात. चौथ्या वर्गात जाईपर्यंत त्यांना वाचता-लिहिता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना तुम्हीच ‘ढ’ ठरविता. तो ‘ढ’ असल्याचे सतत त्याच्यावर बिंबविता. त्यातून मुलाचा निरुत्साह वाढतो व तो शाळा सोडतो.
विद्यार्थी शाळेतून बाहेर पडण्यास शिक्षकच जबाबदार आहेत. तुम्ही मनाने व मायेने शिकविले, तर विद्यार्थ्यांची गळती थांबेल. गुणवत्ता वाढून मुलांचा आत्मविश्वास वाढेल. पर्यायाने शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत. तुम्हाला अशा मागण्याही कराव्या लागणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी प्रथम प्रामाणिकपणे मुलांना शिकविले पाहिजे. विद्यार्थी नापास होणे हे पाप शिक्षकांचेच आहे, हे स्पष्ट करून बागडे म्हणाले की, शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी मी शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आदी संबंधितांशी महामंडळाच्या नेत्यांची बोलणी करून देतो. माझी भूमिका तेवढीच मर्यादित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेचे अध्यक्ष विजय नवल पाटील म्हणाले की, सरकारी शाळा गुणवत्तेअभावी बंद पडत आहेत. या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यावर सरकार दरमहा ५ हजार रुपये खर्च करते; परंतु संस्थेच्या शाळांमधून एका विद्यार्थ्यावर दीड हजार रुपये खर्च येतो. हा खर्चही सरकार देत नाही. यासह शिक्षण संस्थासमोर अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला. ४
आ. विक्रम काळे यांनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात शिक्षक व शाळांसमोरील समस्या पोटतिडकीने मांडल्या. ते म्हणाले की, शिक्षण संस्थाचालक म्हणजे चोरच असल्याच्या आविर्भावात प्रत्येक जण त्याच्याकडे पाहतो आहे. आमच्या सरकारने शक्य तेवढे चांगले निर्णय घेतले. आता उर्वरित निर्णय नव्या सरकारने घ्यायचे आहेत. नाना, तुम्ही शिक्षणात चांगले दिवस आणा, असे साकडेही त्यांनी हरिभाऊ बागडे यांना घातले.
४यावेळी मंचावर प्रा. एच.एम. देसरडा, सर्जेराव ठोंबरे, उद्धव भवलकर, फादर रॉड्रिग्ज, सुशीला मोराळे, मिलिंद पाटील, वाल्मीक सुरासे, आनंद खरात, सूर्यकांता गाडे, अनिल नखाते, मनोज पाटील, शिल्पा दुशिंगे, मिर्झा सलीम, मिलिंद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
४स्वागताध्यक्ष एस.पी. जवळकर यांनी मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. शिवानंद भानुसे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद पाटील यांनी आभार मानले.

Web Title: And they remember the duty of the NAN

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.