...अन् पैशांसाठी थांबविली शस्त्रक्रिया
By Admin | Updated: July 31, 2016 01:32 IST2016-07-31T01:07:32+5:302016-07-31T01:32:24+5:30
औरंगाबाद : आॅपरेशन थिएटरमध्ये ऐनवेळी शस्त्रक्रिया थांबवून रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी करण्यात आल्याची घटना शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात घडली.

...अन् पैशांसाठी थांबविली शस्त्रक्रिया
औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी योजना मंजूर झालेली असताना आॅपरेशन थिएटरमध्ये ऐनवेळी शस्त्रक्रिया थांबवून रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी करण्यात आल्याची घटना शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात घडली. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी ही योजना मंजूर झाली आहे. परंतु ही शस्त्रक्रिया शक्य नसल्याने ओपन सर्जरी करावी लागेल, त्यासाठी पैसे भरावे लागतील, असे रुग्णालय प्रशासनाने ऐनवेळी सांगितले. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी धावपळ करून पैशांची जुळवाजुळव करण्याची वेळ रुग्णाच्या नातेवाईकांवर आली.
दिलीप सोळुंके यांच्या आई शोभा सोळुंके यांना पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी पंधरा दिवसांपूर्वी डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया जीवनदायी योजनेतून करण्यास मंजुरी मिळाली होती.
शस्त्रक्रियेसाठी त्यांना आॅपरेशन थिएटरमध्येही नेण्यात आले. आॅपरेशन थिएटरमध्ये त्यांना नेऊन चार तास उलटले. परंतु त्यानंतर बाहेर आलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दिलीप सोळुंके यांना शस्त्रक्रियेसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगितले. जीवनदायी योजना मंजूर असताना पैशांसाठी शस्त्रक्रिया थांबल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे ऐनवेळी पैसे कसे भरायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यांनी धावपळ करून पैसे जमा केले. शस्त्रक्रिया करण्यासाठी ऐनवेळी पैसे भरण्यास सांगितल्याने या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शस्त्रक्रियेच्या परिस्थितीविषयी संपूर्ण कल्पना देण्याची आवश्यकता होती. आधीच सर्व शक्यता पडताळून पाहणे गरजेचे होते. परंतु तसे न करता पैशांसाठी शस्त्रक्रिया थांबविण्यात आली.
याविषयी रुग्णालयातर्फे देण्यात आलेली माहिती अशी, सदर शस्त्रक्रिया आधी दुर्बिणीद्वारे केली जाणार होती. ही शस्त्रक्रिया जीवनदायीतून करण्यास मंजुरी मिळाली होती. परंतु ऐनवेळी दुर्बिणीऐवजी ओपन सर्जरी करावी लागणार असल्याचे लक्षात आले. ओपन सर्जरी जीवनदायीतून होत नाही. त्यामुळे हा प्रकार झाला.
सर्व नियमाप्रमाणे केले
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येणार नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करावे, मुंबईच्या पथकाची मदत घेण्यात आली.
४यामध्ये रुग्णालयाची कोणतीही चूक नाही. ओपन सर्जरीसाठी पैसे भरणे आवश्यक होते. सर्व काही नियमानुसार केले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना संपूर्ण कल्पना दिली होती.
४डॉ. सोपान कदम, एमसीओ, राजीव गांधी जीवनदायी योजना, डॉ.हेडगेवार रुग्णालय