भोंदूबाबा अन् त्याचे साथीदार सापडेनात
By Admin | Updated: August 2, 2014 01:44 IST2014-08-02T01:25:34+5:302014-08-02T01:44:30+5:30
औरंगाबाद : जादूने पैशाचा पाऊस पाडून चौपट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवीत अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा

भोंदूबाबा अन् त्याचे साथीदार सापडेनात
औरंगाबाद : जादूने पैशाचा पाऊस पाडून चौपट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवीत अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा भोंदूबाबा साहेबखान व त्याचे साथीदार अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. विशेष म्हणजे या टोळीत सहभागी असलेल्या पोलिसांची अद्याप ओळख परेडही घेण्यात आलेली नाही.
नारेगाव येथील रहिवासी असलेला साहेबखान यासीन खान ऊर्फ सत्तार बाबा, त्याचा साथीदार अश्फाक व डॉ. शेख या तिघांनी सिडको एमआयडीसी ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लुटमारीचा धंदाच सुरू केला होता. पैशाचा पाऊस पाडून चौपट रक्कम करून देतो, असे आमिष दाखवून बाबा व त्याचे पंटर ग्राहकांना शोधून आणत. मग बाबा पाऊस पाडण्यासाठी चिकलठाणा परिसरातील एका शेतात जादूचा खेळ मांडत. त्याच वेळी सिडको एमआयडीसी पोलीस तेथे छापा मारत आणि सगळे काही लुटून घेऊन जात. नंतर पोलीस व बाबा लुटलेल्या रकमेचे हिस्से करून घेत होते. लुटलेला इसम तक्रार देण्यासाठी गेला तर त्याची फिर्यादही नोंदवून घेण्यात येत नव्हती. उलट धमकावून फिर्यादीला हुसकावून लावण्यात येत असे.
अशा पद्धतीने चोर - पोलिसांच्या या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे नुकतेच उघड झाले आहे. या टोळीविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हेही सिडको एमआयडीसी ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, या बाबाच्या टोळीत सहभागी असलेले पोलीस कोण आहेत, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांची ओळख परेड घेणे गरजेचे आहे; परंतु अद्याप ही ओळख परेड झालेली नाही. त्यामुळे हे पोलीसही बाबाप्रमाणेच फरार होण्याची शक्यता आहे.
पोलिसांशी मिलीभगत असल्याने गुन्हे दाखल होण्याची चाहूल लागताच बाबा व त्याचे साथीदार पसार झाले आहेत. अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यात सहभागी असल्याने पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांनीच आता या तपासावर लक्ष केंद्रित केले आहे.